काळ्या पैशाविरुद्धच्या कारवाईने कॉंग्रेस बिथरलाय : नायडू

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 30 डिसेंबर 2016

नवी दिल्ली - नोटाबंदीच्या रूपाने मोदींनी भ्रष्टाचार विरोधातील लस आणली आहे. सरकारने काळ्या पैशाविरुद्ध कारवाई सुरू केल्याने कॉंग्रेस पक्ष बिथरला आहे; पण सरकार यामुळे विचलित होणार नाही आणि सात दशकांपासून सुरू असलेला भ्रष्टाचार निपटून काढेल, असा इशारा माहिती व प्रसारणमंत्री व्येंकय्या नायडू यांनी दिला.

नवी दिल्ली - नोटाबंदीच्या रूपाने मोदींनी भ्रष्टाचार विरोधातील लस आणली आहे. सरकारने काळ्या पैशाविरुद्ध कारवाई सुरू केल्याने कॉंग्रेस पक्ष बिथरला आहे; पण सरकार यामुळे विचलित होणार नाही आणि सात दशकांपासून सुरू असलेला भ्रष्टाचार निपटून काढेल, असा इशारा माहिती व प्रसारणमंत्री व्येंकय्या नायडू यांनी दिला.

सरत्या वर्षाला निरोप देण्याच्या निमित्ताने आज झालेल्या पत्रकार परिषदेत नायडू यांचा मोदी सरकाराच्या निर्णयांपेक्षा कॉंग्रेसवर टीकेचा भर अधिक होता. कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी नोटाबंदीचा निर्णय अपयशी ठरवून सरकारकडे यावर श्‍वेतपत्रिकेची मागणी केली आहे. त्यावर प्रत्युत्तर देताना नायडूंनी विरोधकांना काळा पैसा श्‍वेत झालेला नको आहे, म्हणूनच ते श्‍वेतपत्रिकेबद्दल बोलत आहेत. सरकारला "स्वच्छ भारत' करण्याचा जनादेश मिळाला असून, जनतेच्या अपेक्षांनुसार सरकार काम करते आहे; मात्र कॉंग्रेसकडून कथित घोटाळ्यांचे निरर्थक आरोप सुरू आहेत.

बेछूट आरोप करणे आणि पळ काढणे हा कॉंग्रेसचा स्वभाव आहे; पण मोदींनी नोटाबंदीद्वारे भ्रष्टाचार विरोधातील लस (अँटी स्कॅम व्हॅक्‍सिन) आणली आहे. यामध्ये काळा पैसा बाळगणाऱ्यांविरुद्ध कारवाई सुरू झाल्याने बिथरलेल्या कॉंग्रेसचा थयथयाट सुरू आहे, असा टोला व्येंकय्या नायडूंनी लगावला.

तन, मन आणि धनाने देशाच्या स्वच्छतेचा यज्ञ सुरू आहे. यज्ञामध्ये असुरांकडून विघ्न आणले जाते, अशा शब्दांत नायडूंनी पन्नास जणांना फायदा पोचविण्यासाठी नोटाबंदीचा यज्ञ असल्याच्या राहुल गांधींच्या विधानाची खिल्ली उडवली. यूपीएच्या काळात पंतप्रधानांचा केवळ चेहरा होता. प्रत्यक्षात निर्णय "मॅडम' घेत होत्या. आता मात्र पंतप्रधान निर्णय घेतात आणि मंत्रिमंडळ त्यानुसार काम करते. घोटाळेमुक्त प्रशासन राबविले जात असून, धोरण लकवा आणि अविश्‍वासाचे वातावरण गेल्या अडीच वर्षांत संपले. भारत बदलला आहे; परंतु कॉंग्रेसमध्ये बदल झालेला नाही, असा चिमटाही त्यांनी काढला.

पैसे व्यवस्थेत यावा हाच हेतू

नोटाबंदीनंतर बॅंकांमध्ये पंधरा लाख कोटी रुपयांच्या जुन्या नोटा परत आल्याने काळ्या पैशाचे काय झाले, असा सवाल विरोधकांकडून केला जात आहे. त्याचा समाचार घेताना नायडूंनी "व्यवस्थेच्या बाहेर असलेला पैसा अर्थव्यवस्थेत परत यावा, हाच नोटाबंदीचा हेतू होता'', असा दावा केला. हा पैसा आधी व्यवस्थेच्या बाहेर होता. नोटाबंदीमुळे तो पुन्हा व्यवस्थेत आल्याचे ते म्हणाले.

 

Web Title: Congress is direction less : Naidu