#DecodingElections : हिंदुस्तानच्या हृदयात घुसले काँग्रेस!

मंगळवार, 11 डिसेंबर 2018

भारतातील अनेक राज्यांतून नेस्तनाबूत झालेल्या काँग्रेसला तीन राज्यांत विजय मिळविता आल्याने नवसंजीवनी मिळाली आहे. त्यात मध्य प्रदेश आणि राजस्थानसारख्या मोठ्या राज्यांत यश मिळाल्याने आगामी लोकसभा निवडणूक चुरशीची होणार हे निश्चित आहे.

हिंदुस्तानचे हृदय अशी ओळख असलेल्या मध्य प्रदेशात काँग्रेसने 'मामा' शिवराजसिंह चौहान यांना धोबीपछाड देत सत्ता काबीज केली आहे. 'हिंदुस्तान का दिल देखो' अशा जाहिरात असलेल्या मध्य प्रदेशात काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवत भारताच्या हृदयात स्थान मिळविले आहे.

मध्य प्रदेशात काँग्रेसने गेल्या पंधरा वर्षांपासून सत्तेत असलेल्या शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्वाला धक्का दिला आहे. काँग्रेस मध्य प्रदेशात कमलनाथ, ज्योतिरादित्य सिंधिया आणि दिग्विजय सिंह यांच्या साथीने निवडणुकीला सामोरे गेले. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी या तिघांना एकत्र आणून निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. या तिघांना एकत्र आणून एकाच व्यासपीठावर आणण्याचे अवघड काम काँग्रेस अध्यक्षांना करावे लागले. आपल्या वायफळ बडबडीमुळे सतत चर्चेत राहणाऱ्या दिग्विजयसिहांना राहुल गांधींनी प्रचारापासून दुर ठवले. तर, ज्योतिरादित्य सिंधिया आणि कमलनाथ या तरूण व ज्येष्ठ जोडीला व्यवस्थित होताळत भाजपचा पराभव हे एकमेव उद्दिष्ट समोर ठेवले. 

मी प्रचारात उतरलो तर काँग्रेसचा पराभव होईल, याला यंदा काँग्रेसने गंभीरपणे घेत दिग्विजयसिंहांना प्रचारात घेण्याची 2014 ची चूक पुन्हा केली नाही. त्याउलट भाजपला शेतकऱ्यांची नाराजी, बेरोजगारी यासारख्या मुद्द्यांचा फटका बसल्याचे स्पष्ट दिसत आहे. तिकीट वाटपात झालेला घोळ हाही भाजपच्या पराभवाला कारणीभूत ठरल्याचे  बोलले जात आहे. 

भारतातील अनेक राज्यांतून नेस्तनाबूत झालेल्या काँग्रेसला तीन राज्यांत विजय मिळविता आल्याने नवसंजीवनी मिळाली आहे. त्यात मध्य प्रदेश आणि राजस्थानसारख्या मोठ्या राज्यांत यश मिळाल्याने आगामी लोकसभा निवडणूक चुरशीची होणार हे निश्चित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यातील टक्कर आता काँटे की होणार हे या निकालामुळे आणखी स्पष्ट झाले आहे.

Web Title: Congress entered the Hindusthan ka Dil with MP win