कर्नाटकात राजकीय कसरत सुरू; किती उपमुख्यमंत्री असणार?

वृत्तसंस्था
मंगळवार, 22 मे 2018

काँग्रेस आणि जेडीएसच्या आघाडीबाबत भुतकाळ विसरून भविष्यकाळाकडे पाहण्याची गरज असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले, की कुमारस्वामींचा शपथविधी सोहळा, विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक आणि सभागृहातील विश्वासदर्शक ठराव याबाबत पक्षाकडून लक्ष दिले जात आहे. 

नवी दिल्ली : धर्मनिरपेक्ष जनता दलाचे (जेडीएस) नेते कुमारस्वामी यांची मुख्यमंत्रिपदी नियुक्ती निश्चित झाली आहे. कुमारस्वामी यांचा शपथविधी सोहळा उद्या (बुधवार) होणार आहे. तत्पूर्वी कुमारस्वामी यांनी संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए) अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. काँग्रेसला कर्नाटकात उपमुख्यमंत्रिपद आणि विधानसभेचे अध्यक्षपद मिळणार असल्याची चर्चा सुरु आहे. 

भाजपचे बी. एस. येडियुरप्पा यांनी बहुमत चाचणीपूर्वीच आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे राज्यात काँग्रेस आणि जेडीएस आघाडीला सरकार स्थापनेचे निमंत्रण देण्यात आले. त्यानंतर कुमारस्वामी यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीदरम्यान काँग्रेस नेत्यांना शपथविधीसाठी उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले. काँग्रेसला कर्नाटकात उपमुख्यमंत्रिपद आणि विधानसभेचे अध्यक्षपद मिळणार असल्याची चर्चा सुरु आहे. मात्र, याबाबत राहुल गांधी स्वत: निर्णय घेणार आहेत.  

काँग्रेस आणि जेडीएसच्या आघाडीबाबत भुतकाळ विसरून भविष्यकाळाकडे पाहण्याची गरज असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले, की कुमारस्वामींचा शपथविधी सोहळा, विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक आणि सभागृहातील विश्वासदर्शक ठराव याबाबत पक्षाकडून लक्ष दिले जात आहे. 

दरम्यान, उद्या (बुधवार) होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात फक्त कुमारस्वामी हेच मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. यादरम्यान एकही आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार नाही, अशी माहिती देण्यात येत आहे.

राज्यात दोन उपमुख्यमंत्रिपदे ?

राज्यात दोन उपमुख्यमंत्रिपदे निर्माण केली जाण्याची शक्यता असून, राज्यातील दलित नेते असलेले जी. परमेश्वर आणि विरशैवा-लिंगायत समाजातील नेते एम. बी. पाटील यांची उपमुख्यमंत्रिपदी वर्णी लागणार अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Web Title: Congress to get deputy CM speaker posts in Karnataka