काँग्रेसमध्ये उफाळला अंतर्कलह

काँग्रेसमध्ये उफाळला अंतर्कलह

नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीत भोपळाही न फोडू शकलेल्या काँग्रेसमध्ये अंतर्कलह उफाळून आला आहे. दिल्लीतील नेते संदीप दीक्षित यांनी काँग्रेसच्या या दारुण परिस्थितीसाठी पक्षश्रेष्ठींना जबाबदार धरले आहे. तर, शशी थरूर यांनी त्यांची पाठराखण करून या वादात उडी घेतली. यामुळे नाराज काँग्रेस पक्षाने दोन्ही नेत्यांना कानपिचक्‍या दिल्या आहेत.

मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे पुत्र आणि माजी खासदार संदीप दीक्षित यांनी पक्षश्रेष्ठींच्या धोरणावर आज उघडपणे हल्ला चढवला. दिल्लीत काँग्रेस पक्ष रसातळाला गेल्याचा हल्लाबोल करून त्यांनी खळबळ उडवून दिली. बरेच महिने होऊनही वरिष्ठ नेते नव्या पक्षाध्यक्षांची नियुक्ती करू शकलेले नाहीत. कुणाला तरी निष्क्रियता हवी आहे. निवृत्तीच्या मार्गावर असलेले नेतेही पक्षासाठी काहीही करत नाहीत, असा प्रहार त्यांनी केला. तसेच, ज्येष्ठ नेत्यांनी आता पुढे येऊन कठोर निर्णय करण्याची आवश्‍यकता आहे, असे आवाहनही केले. 

नव्या नेत्याची निवड करा ः शशी थरूर
शशी थरूर यांनी संदीप दीक्षित यांची पाठराखण करणारे ट्‌विट करून देशभरात काँग्रेसच्या नेत्यांमध्ये श्रेष्ठींबद्दल नाराजी असल्याला दुजोरा दिला. थरूर यांनी म्हटले की, काँग्रेसमध्ये पक्षश्रेष्ठींविरुद्ध टोकाची नाराजी आहे. संदीप दीक्षित यांच्याप्रमाणेच पक्षातील इतर नेत्यांचेही हेच म्हणणे आहे. केंद्रीय कार्यकारिणीने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी लवकरात लवकर नव्या नेतृत्वाची निवड करावी, असेही आवाहन थरूर यांनी केले. 

काँग्रेसकडून कानपिचक्या
काँग्रेस पक्षाने यावर अधिकृत भाष्य करताना संदीप दीक्षित आणि शशी थरूर यांना सूचक शब्दांत कानपिचक्‍या दिल्या. दिल्लीत थोडी तरी मेहनत केली असती, तर काँग्रेसचा पराभव झाला नसता, असा टोला पक्षाचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी संदीप दीक्षित यांना लगावला. तर, शशी थरूर यांनी काँग्रेस कार्यकारिणीचा प्रस्ताव वाचून ज्ञानवर्धन करावे, असा खोचक सल्लाही रणदीप  सुरजेवाला यांनी या वेळी दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com