काँग्रेस व जेडीएसच्या आमदारांचे विधीमंडळाबाहेर धरणे आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 मे 2018

काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. पण, सर्वोच्च न्यायालयाने येडियुरप्पांच्या शपथविधी रोखण्यास नकार दिला. यानंतर येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, ते तिसऱ्यांदा कर्नाटकचे मुख्यमंत्री झाले आहेत.

बंगळूर : कर्नाटकमध्ये सत्तास्थापनेसाठी चालू असलेल्या प्रयत्नांना काही काळासाठी का होईना पूर्णविराम मिळाला आहे, पण यामुळे कर्नाटकाला आंदोलनाचे रूप आले आहे. आज (ता. 17) भाजपचे नेते बी. एस. येडियुरप्पा यांनी राज्यपाल वजुभाई वाला यांच्या उपस्थितीत कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे विरोधी पक्ष काँग्रेस व जेडीएस पक्षांनी विधानभवनाबाहेर धरणे देत निदर्शने केली.

BS Yeddyurappa

राज्यपाल वजुभाई यांनी बुधवारी (ता.16) रात्री भाजपला सत्तास्थापनेसाठी आमंत्रित केले. याविरोधात काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. पण, सर्वोच्च न्यायालयाने येडियुरप्पांच्या शपथविधी रोखण्यास नकार दिला. यानंतर येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, ते तिसऱ्यांदा कर्नाटकचे मुख्यमंत्री झाले आहेत.  

येडियुरप्पांच्या शपथविधीला विरोध करत काँग्रेस व जेडीएस पक्षांनी विधीमंडळाच्या आवारातील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करत निदर्शन केले. काँग्रेस पक्षाचे अशोक गेहलोत, गुलाम नबी आझाद, मल्लिकार्जून खर्गे व जेडीएसचे इतर नेते या आंदोलनात सहभागी होते. तसेच रिसॉर्टवर पाठवण्यात आलेले आमदारही यावेळी उपस्थित राहून आंदोलनात सहभागी होते.  

भाजपला बहुमत सिद्ध करण्यासाठी 15 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. तर काँग्रेस व जेडीएसने युती करत बहुमताने सत्तास्थपनेचा दावा केला आहे. पम राज्यपालांनी भाजपला प्रथम निमंत्रित केल्याने या पक्षांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. 'भाजपने लोकशाहीविरोधी कृत्य केले असे आता आम्ही जनतेसमोर जोऊन सांगू शकतो, तसेच सत्तास्थापनेबाबत प्रकरण हे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे', असे माजी मुख्यमंत्री सिद्धरामैय्या यांनी सांगितले.  

Web Title: Congress Jds Mlas And Leaders Protest front of Karnataka Assembly Against Bjp