Loksabha 2019 : गरीब नाही, श्रीमंत ठेवतात चौकीदार: प्रियांका गांधी

Priyanka Gandhi
Priyanka Gandhi

प्रयागराज : "गरीब नव्हे, श्रीमंत लोक चौकीदार ठेवतात. मला एका शेतकरी भावाने सांगितले, की चौकीदार तर श्रीमंतांचे असतात आम्ही शेतकरी तर स्वतःच स्वतःचे रखवालदार आहोत,'' अशा शेलक्‍या शब्दांत कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी भाजपवर टीका केली. 

लोकसभेच्या रणधुमाळीला रंग चढत असून कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या उत्तर प्रदेश दौऱ्याला आजपासून प्रारंभ झाला. प्रयागराज येथे हनुमान मंदिराचे दर्शन घेऊन संगम येथे पूजा केली. त्यानंतर बोटीतून प्रयागराजहून वाराणसीकडे प्रियांका गांधी तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी रवाना झाल्या. 20 मार्चला त्या वाराणसीला पोचतील. 

राफेल प्रकरणावरून कॉंग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना "चौकीदार चोर है'चा नारा देत सातत्याने वेठीला धरले आहे. मात्र, या टीकेलाच आपले हत्यार बनवताना भाजपने आता "मै भी चौकीदार' हे अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत भाजपच्या सर्वच नेत्यांनी आपल्या ट्‌विटर हॅंडलच्या नावात बदल करून पूर्वीच्या नावापुढे चौकीदार शब्द लावला आहे. या मोहिमेवर प्रियांका यांनी जोरदार टीका केली. 

बोटीतून दौरा सुरू करण्यापूर्वी प्रियांका गांधी यांनी दुमदुमा घाट येथे उपस्थितांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी मोदी सरकारच्या धोरणावर टीका केली. त्या म्हणाल्या, "गेल्या काही काळापासून शेतकरी अडचणीत सापडला आहे. बेरोजगारांची संख्या वाढत चालली आहे. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कोणीही पुढे येत नाही. असे असताना केंद्र सरकार उद्योगपती मित्रांसाठी हजारो-कोट्यवधी रुपये देत आहे.'' पंतप्रधानांवर टीका करताना त्या म्हणाल्या, की चौकीदार हे शेतकऱ्यांचे नाही तर श्रीमंतांचे असतात. राज्यातच नाही तर देशात अनेक ठिकाणी पिकांना हमीभाव मिळत नसल्याचे चित्र आहे. प्रयागराज येथे बोलताना त्या म्हणाल्या, ""आज देशाची घटना संकटात आहे, त्यामुळे मला घराबाहेर पडावे लागले. शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नाहीत, पाच वर्षांत बेरोजगारी वाढली आहे.'' 

प्रयागराज येथे दर्शन आणि पूजेनंतर प्रियांका गांधी यांचा ताफा शहरापासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या मनैया घाटवर पोचला. तेथे त्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधला आणि तेथून बोटीने यात्रा सुरू केली. बोटीवर त्यांच्यासमवेत अलाहाबाद विद्यापीठाचे काही विद्यार्थी आणि कॉंग्रेसचे काही नेते होते. भाजपमधून नुकत्याच कॉंग्रेसमध्ये गेलेल्या सावित्रीबाई फुलेही त्यांच्यासोबत आहेत. 
प्रयागराज ते वाराणसी हे शंभर किलोमीटरचे अंतर बोटीतून पार करण्यात येणार आहे. वाराणसी हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ आहे. 

यादरम्यान प्रियांका गांधी यांनी केलेल्या ट्विटमध्ये स्वराज भवनच्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यांनी म्हटले की, स्वराज भवन येथे त्यांच्या आजी, माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांचा जन्म झाला. ""माझ्या आजीचा जन्म ज्या ठिकाणी झाला, ती खोली मी पाहिली. रात्री झोपताना मला ती जॉन ऑफ आर्कच्या गोष्टी सांगायची. त्यांचा प्रत्येक शब्द आजही माझ्या कानात घुमतोय. भयमुक्त राहा, सर्वकाही ठीक होईल.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com