
Rahul Gandhi : पांढरा कुर्ता, कुंकवाचा टिळा...; यंदाच्या परदेश दौऱ्यात राहुल गांधींचा अंदाजच बदलला, काय आहे कारण?
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचा ब्रिटन दौरा वादात होता. राहुल गांधींनी तिथे केलेल्या काही कमेंट्सवरून देशात मोठा गदारोळ झाला होता. आता राहुल गांधी पुन्हा एकदा परदेश दौऱ्यावर गेले आहेत. मात्र यावेळी त्यांचं रुप काहीसं बदललेलं दिसत आहे.
मंगळवारी राहुल गांधी अमेरिकेत गेले, ते तिथे पोहोचले तेव्हा ते जीन्स टीशर्टमध्ये दिसले. पण जेव्हा त्यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठात भाषण केलं, त्याप्रसंगी त्यांनी एकदम देसी लूक केलेला दिसला. यामध्ये त्यांनी कुर्ता पायजमा जाकीट आणि कपाळावर टिळा लावला होता. राहुल गांधींचं टार्गेट मात्र नरेंद्र मोदी सरकारच होतं.
लंडनमध्ये राहुल गांधींनी बंदगळा सूट घातला होता. आता त्यांनी अमेरिकेत केलेला पेहराव म्हणजे परदेशात त्यांची भारतीय ही प्रतिमा आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न असू शकतो. कॅलिफोर्नियातील सांता क्लारा इथं बुधवारी राहुल गांधींचा कार्यक्रम होता. इथं राहुल गांधींचं भारतीय पद्धतीने कपाळावर टिळा लावून स्वागत करण्यात आलं.
राहुल गांधींनी इथं कार्यकर्ते, शिक्षणतज्ज्ञ आणि नागरिकांशी संवाद साधला. यामध्ये राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेचाही उल्लेख केला. राहुल म्हणाले, 'भारत जोडो यात्रा रोखण्यासाठी सरकारने सर्व शक्ती पणाला लावली. पण काहीच झालं नाही, उलट यात्रेचा प्रभाव वाढत गेला. कारण 'भारत जोडो'ची कल्पना प्रत्येकाच्या मनात आहे.
राहुल गांधी मार्चमध्ये लंडनला गेले होते. अमेरिका आणि युरोपसह जगातील लोकशाही भाग याकडे लक्ष देण्यास अपयशी ठरत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताची लोकशाही संरचना नष्ट करत असल्याचा आरोपही राहुल यांनी केला.त्यांच्या या वक्तव्यावरून देशात राजकीय वाद निर्माण झाला होता.
राहुलचे लंडनमध्ये तीन कार्यक्रम होते. केंब्रिज विद्यापीठात त्यांनी सूट आणि टाय घातला होता. दुसऱ्या कार्यक्रमात ते भारतीय पत्रकारांशी संवाद साधताना बांधगला आणि कुर्ता-पायजमा परिधान केलेले दिसले. मात्र, अमेरिकेत पहिल्या दिवसापासून त्यांनी देसी लूक केला आहे.