थरूर यांनी मांडली पाकची 'कुंडली'

पीटीआय
गुरुवार, 17 ऑक्टोबर 2019

सर्बियातील बेलग्रेड येथे अंतर्गत संसदीय संघ (आयपीयू)च्या बैठकीत काश्‍मीर मुद्दा उपस्थित करणाऱ्या पाकिस्तानवर आज कॉंग्रेस नेते शशी थरूर यांनी ताशेरे ओढले.

नवी दिल्ली : सर्बियातील बेलग्रेड येथे अंतर्गत संसदीय संघ (आयपीयू)च्या बैठकीत काश्‍मीर मुद्दा उपस्थित करणाऱ्या पाकिस्तानवर आज कॉंग्रेस नेते शशी थरूर यांनी ताशेरे ओढले. जम्मू काश्‍मीरच्या असंख्य दहशतवादी हल्ल्यास जबाबदार असणाऱ्या देशाने मानवतेचा उल्लेख करणे ही एकप्रकारची थट्टाच आहे, असे मत थरूर यांनी मांडले आहे. आयपीयूच्या बैठकीसाठी उपस्थित असलेल्या भारतीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचा समावेश आहे. या प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला करत आहेत. 

सर्बियातील बेलग्रेड येथे 13 ते 17 ऑक्‍टोबर कालावधीत आयपीयूचे 141 वे संमेलन झाले. यात भारतीय संसदीय मंडळाकडून बाजू मांडताना थरूर यांनी पाकिस्तानचे निराधार आरोप खोडून काढले. काश्‍मीर मुद्‌द्‌यावरून पाकिस्तानकडून केल्या जाणाऱ्या बदनामीचे प्रयत्न भारतीय संसद कधीही यशस्वी होऊ देणार नाही, असे ते म्हणाले.

भारताच्या अंतर्गत बाबीचा राजकीय लाभ उचलण्याचा पाकिस्तानने प्रयत्न केला आहे. असा प्रयत्न करणे हे निषेधार्ह आहे. मी विरोधी पक्षाचा खासदार आहे. आम्ही जम्मू आणि काश्‍मीर तसेच अन्य मुद्द्यावर सरकारशी संसदेच्या माध्यमातून सतत चर्चा करत असतो. आम्ही वैचारिक लढाई खासदार या नात्याने संसदेत लढत असतो. त्यासाठी बाह्य हस्तक्षेप कदापि मान्य नसून त्याचे समर्थनही होऊ शकत नाही. जम्मू काश्‍मीर हा भारताचा अविभाज्य घटक आहे.

काश्‍मीरमधील दहशतवादी हल्ल्यास जे जबाबदार आहेत, तेच देवदूत असल्याचे नाटक करत आहेत. मात्र हे सत्य नाही. भारतीय संसदीय प्रणाली अशा प्रकारच्या द्वेषपूर्ण प्रयत्नांना यशस्वी होऊ देणार नाही. त्यामुळे पाकिस्तानचे शिष्टमंडळ या व्यासपीठावर पुन्हा मुद्दा उपस्थित करणार नाही, अशी अपेक्षा थरूर यांनी व्यक्त केली. दुसऱ्या सत्रातही पाकिस्तानच्या बाजूच्या युक्तिवादाला विरोध करत इस्लामाबादवर टीकास्त्र सोडले.

भारतीय प्रतिनिधीमंडळात थरूर व्यतिरिक्त कनिमोझी करुणानिधी, वानस्यूक सियेम, रामकुमार वर्मा, सस्मित पात्रा यांचा समावेश आहे. 

थरूर काय म्हणाले...

संयुक्त राष्ट्रसंघाने अल कैदा आणि इसिस या दहशतवादी संघटनेच्या संबंधावरून निर्बंध घातलेल्या व्यक्तींना निवृत्ती वेतन देणारे पाकिस्तानचे जगातील एकमेव सरकार आहे.

पाकिस्तानात 130 दहशतवादी आणि 25 दहशतवादी संघटना सक्रिय असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केले आहे. आजघडीला दहशतवाद हा मानवतेचा मोठा शत्रू असताना दहशतवाद्यांना थारा देणाऱ्या देशाच्या प्रतिनिधीमंडळाकडून मानव अधिकाराचा उल्लेख करणे म्हणजे थट्टाच म्हणावी लागेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress Leader shashi tharoor Criticizes on Pakistan