पंतप्रधानांना असे वागणे शोभते का?; चित्रीकरणावरून काँग्रेसचा निशाणा

पीटीआय
शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019

'पुलवामात 14 फेब्रुवारीला दुपारी 'सीआरपीएफ'वर दहशतवादी हल्ला झाला त्यादिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानात सायंकाळपर्यंत चित्रपटाच्या चित्रीकरणात मग्न होते,' अशी टीका काँग्रेसने गुरुवारी केला. 

नवी दिल्ली : 'पुलवामात 14 फेब्रुवारीला दुपारी 'सीआरपीएफ'वर दहशतवादी हल्ला झाला त्यादिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानात सायंकाळपर्यंत चित्रपटाच्या चित्रीकरणात मग्न होते,' अशी टीका काँग्रेसने गुरुवारी केला. 

माध्यमांमधील वृत्ताचा आधार घेत काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत म्हणाले, 'पुलवामात दुपारी हल्ला झाला त्यानंतरही मोदी हे कॉर्बेट उद्यानातील 'प्रचार आणि प्रसिद्धी'साठीच्या चित्रीकरणात सायंकाळपर्यंत मग्न होते. सत्तेच्या भूकेमुळे पंतप्रधान त्यांचा राजधर्म विसरत आहेत.'

सुरजेवाला यांनी काही हिंदी दैनिकांमधील बातम्यांचा आधार घेत घटनाक्रम सांगितला. 'पुलवामात 14 फेब्रुवारीला दुपारी 3 वाजून 10 मिनिटांनी हल्ला झाला. काँग्रेसने यावर सायंकाळी सव्वापाचला प्रतिक्रिया दिली. हल्ला झाल्याची मोहिती पंतप्रधानांनाही होती, मात्र स्वतःला राष्ट्रवादी समजणारे मोदी सायंकाळपर्यंत चित्रीकरण करीत होते,' असा दावा त्यांनी केला.

 

'चित्रीकरणातील कर्मचाऱ्यांसह मोदी नौकानयनाचा आनंद लुटत होते. भाजपच्या कार्यकर्त्यांनी नंतर त्यांचा जयजयकार करण्याची व्यवस्था केली होती. पुलवामातील घटनेने व्यथित झालेल्या देशवासीयांनी अन्नाचा कणही घेतला नाही तेव्हा सायंकाळी सातच्या सुमारास पंतप्रधान बांधकाम विभागाच्या विश्रांतिगृहात सरकारी खर्चाने चहा-सामोशाचा आस्वाद घेत होते,' असे सुरजेवाला म्हणाले.

देशातील पंतप्रधानांकडून अशा प्रकारचे वागणे शोभते का? असा सवाल करून चित्रीकरणाऐवजी पंतप्रधानांनी घटनेनंतर लगेचच देशाच्या सुरक्षेवर मंत्रिमंडळाची बैठक घेऊन कार्यवाहीस सुरवात करायला हवी होती, असे त्यांनी स्पष्ट केले. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यावरही टीका करताना ते दहशतवादाचे राजकारण करीत असल्याचे ते म्हणाले. 

Web Title: Congress Leader Surjewala Criticizes PM Narendra Modi