esakal | हायकमांडला नोटिशीमुळे काँग्रेस नेत्यांमध्ये संताप
sakal

बोलून बातमी शोधा

congress

दिल्लीतील दंगलीच्या पार्श्वभूमीवर हिंसाचाराला चिथावणी दिल्याच्या आरोपावरून सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधींना बजावलेल्या नोटिशीवरून काँग्रेसने संताप व्यक्त केला.

हायकमांडला नोटिशीमुळे काँग्रेस नेत्यांमध्ये संताप

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली - दिल्लीतील दंगलीच्या पार्श्वभूमीवर हिंसाचाराला चिथावणी दिल्याच्या आरोपावरून सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधींना बजावलेल्या नोटिशीवरून काँग्रेसने संताप व्यक्त केला. कपिल मिश्रा, अनुराग ठाकूर, गिरिराजसिंह या भाजप नेत्यांविरुद्ध अद्याप गुन्हा का नोंदविला नाही, अशी विचारणा काँग्रेसने आज केली.

काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक सिंघवी यांनी या कारवाईवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. चिथावणीखोर भाषण करणारे कोण आहेत, हे जगजाहीर आहे. कपिल मिश्रा, प्रवेश वर्मा, अनुरागसिंह ठाकूर यांच्याविरुद्ध गुन्हा का नोंदविण्यात आलेला नाही. 

भडक बोलणारे चिन्मयानंद , संगीत सोम यांच्यावरही कधी  गुन्हा दाखल झाला नाही. त्यांची वक्तव्ये तर सोनिया, राहुल यांच्या कथित वक्तव्यांच्या तुलनेत खालच्या दर्जाची होती, असे टीकास्त्र त्यांनी सोडले.

याबाबतच्या जनहित याचिकेच्या हेतूवरही सिंघवी यांनी शंका उपस्थित केली. या प्रकरणातील याचिकाकर्ता हे शिवराजसिंह मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री असताना राज्याचे महाधिवक्ता राहिलेले आहेत. त्यावरूनच याचिकेचा हेतू कळतो, असा टोलाही त्यांनी लगावला.

पंतप्रधान मोदींनी शांततेचे आवाहन करण्यासाठी तीन दिवस का लावले आणि गृहमंत्री अमित शहा अजूनही मौन का आहेत. गृहमंत्र्यांनी दंगलग्रस्त भागाचा दौरा करणे आवश्यक होते; परंतु अजूनही त्यांनी तसे केलेले नाही.
- कपिल सिब्बल, नेते काँग्रेस

loading image