काँग्रेस आमदरांनाही भाजपमध्ये यायचंय : पर्रीकर

टीम ई सकाळ
बुधवार, 15 मार्च 2017

"मला मेसेज करण्यापासून मी कोणाला थांबवू शकत नाही. मला त्यात रस नाही. परंतु त्यांच्या पक्षाचा राजीनामा देऊन लोकांना भाजपमध्ये यायचं असल्याचा मेसेज करण्यापासून मी त्यांना रोखू शकत नाही."

पणजी : गोव्यातील तीन प्रादेशिक पक्ष व अपक्षांच्या पाठिंब्यावर नुकतीच गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेले मनोहर पर्रीकर यांच्याशी आता काँग्रेसचे नेतेही संपर्कात आहेत. खुद्द पर्रीकर यांनीच हा दावा केल्याने खळबळ उडाली आहे. 
काँग्रेसचे आमदार त्यांच्या नेतृत्वाला वैतागले असून, ते भाजपमध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. त्यांनी आपल्या मोबाईलवर मेसेज करून तसे सांगितल्याचा दावा पर्रीकर यांनी एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला. 

काँग्रेस गोव्यात सर्वांत मोठा पक्ष ठरूनही त्यांना सरकार बनवता आले नाही. राज्यपालांनी भाजपला सरकार स्थापन करण्यासाठी निमंत्रित केले. काँग्रेसने पर्रीकर यांचा शपथविधी रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तो राज्यपालांचा विशेषाधिकार असल्याचे सांगून न्यायालयाने काँग्रेसची याचिका निकालात काढली. त्यांना गुरुवारी बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. 

"मला मेसेज करण्यापासून मी कोणाला थांबवू शकत नाही. मला त्यात रस नाही. परंतु त्यांच्या पक्षाचा राजीनामा देऊन लोकांना भाजपमध्ये यायचं असल्याचा मेसेज करण्यापासून मी त्यांना रोखू शकत नाही. 
काँग्रेस पक्ष अजूनही त्यांचा नेताच निवडू शकलेला नाही. हे नेते आपसातच भांडत आहेत. माझ्या नैतिकतेमुळे मी त्यांना भाजपमध्ये घेतलेले नाही,' असा चिमटा त्यांनी काढला.
 

Web Title: congress legislators want to join bjp, says parrikar