मोदी सरकारच्या सेंच्युरीवर काँग्रेसचा व्हिडिओ

वृत्तसंस्था
Sunday, 8 September 2019

सरकारच्या विविध निर्णयांवरून काँग्रेसने मोदी सरकारवर व्हिडिओच्या माध्यमातून टीका केली आहे. मोदींचे परदेश दौरे, आर्थिक स्थिती, भाजप नेत्यांची बेताल वक्तव्ये असे शंभर मुद्दे एकत्र करून व्हिडिओ बनविण्यात आला आहे.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवून पुन्हा सत्तेवर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या (एनडीए) दुसऱ्या इनिंगचे पहिले शंभर दिवस पूर्ण झाल्याने काँग्रेसने सरकारच्या निर्णयांची खिल्ली उडविणारा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे.

शनिवारी (ता. 7) मोदी सरकारला 100 दिवस पूर्ण झाले. दुसऱ्या कार्यकाळात मोदींबरोबर अरुण जेटली, सुषमा स्वराज यासारखे दिग्गज नाहीत; पण अमित शहांसारखे मोदींचे वास्तवातील 'सरदार' आता सरकारमध्ये आले आहेत. मात्र, प्रत्यक्षात अर्थव्यवस्थेची स्थिती दिवसेंदिवस दयनीय होत चालल्याचे वास्तव चटके देऊ लागले. आर्थिक मंदीच्या पहिल्या पदरवांनीच हजारो लोक एका फटक्‍यात बेरोजगार झाले. वाहन उद्योग, बांधकाम उद्योग, पायाभूत सुविधा या साऱ्याच क्षेत्रांत मरगळ जाणवू लागली. एप्रिल 2018 च्या तिमाहीत आठ टक्‍क्‍यांवर असणाऱ्या विकास दराची (जीडीपी) नंतरच्या जेमतेम वर्षभरात पाच टक्‍क्‍यांवर घसरण झाली. पहिल्या कार्यकाळातील नोटाबंदीसारख्या निर्णयांचा आणि घिसडघाईत लागू केलेल्या वस्तू व सेवा कराचा (जीएसटी) फटका प्रत्यक्षात बसू लागला आहे.

सरकारच्या विविध निर्णयांवरून काँग्रेसने मोदी सरकारवर व्हिडिओच्या माध्यमातून टीका केली आहे. मोदींचे परदेश दौरे, आर्थिक स्थिती, भाजप नेत्यांची बेताल वक्तव्ये असे शंभर मुद्दे एकत्र करून व्हिडिओ बनविण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress make video on BJP Government completes 100 days