मुख्यमंत्र्यांच्या आजाराचे काँग्रेसकडून राजकारण 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आरोग्यासंदर्भात कॉंग्रेसने मोर्चा आणून तसेच जनआक्रोश असे विविध प्रकारे लोकांची दिशाभूल करण्याचे प्रयत्न केले. त्यांच्या आरोग्याबाबत शंका घेऊन न्यायालयाचे दारेही ठोठावली मात्र मुख्यमंत्र्यांनी नव्या मांडवी व झुआरी पुलांच्या कामांची पाहणी करून आपल्या आरोग्याचा पुरावाच देऊन कॉंग्रेसचा पर्दाफाश केला.

माणुसकी विसरून कॉंग्रेस त्यांच्या आजारपणाचे राजकारण करत असल्याचा टोला गोवा प्रदेश भाजपचे सरचिटणीस व प्रवक्ते सदानंद तानावडे यांनी लगावला. 

पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आरोग्यासंदर्भात कॉंग्रेसने मोर्चा आणून तसेच जनआक्रोश असे विविध प्रकारे लोकांची दिशाभूल करण्याचे प्रयत्न केले. त्यांच्या आरोग्याबाबत शंका घेऊन न्यायालयाचे दारेही ठोठावली मात्र मुख्यमंत्र्यांनी नव्या मांडवी व झुआरी पुलांच्या कामांची पाहणी करून आपल्या आरोग्याचा पुरावाच देऊन कॉंग्रेसचा पर्दाफाश केला.

माणुसकी विसरून कॉंग्रेस त्यांच्या आजारपणाचे राजकारण करत असल्याचा टोला गोवा प्रदेश भाजपचे सरचिटणीस व प्रवक्ते सदानंद तानावडे यांनी लगावला. 

राज्यातील जनतेमध्ये मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याबाबत आदर आहे. 1994 पासून त्यांनी आमदार, विरोधी पक्षनेते तसेच मुख्यमंत्री अशा भूमिका बजावल्या आहेत. गोव्यासाठीचे त्यांचे योगदान जनतेला माहीत आहे. आजारपणासाठी त्यांनी काही काळ विश्रांती घेतली असता कॉंग्रेसने माणुसकी सोडून त्याचा बाऊ केला. मुख्यमंत्री पर्रीकर यांनी मांडवी व झुआरी पुलांवर जाऊन तेथे सुरू असलेल्या कामांची पाहणी केली व अधिकाऱ्यांना सूचनाही केल्या. कॉंग्रेसने त्यांच्या आरोग्यावरून केलेल्या दिशाभूलचा भाजपतर्फे निषेध करण्यात येत आहे.

मुख्यमंत्र्यांनी निवासस्थानाबाहेर पडून ते राज्याचे प्रशासन हाताळण्यास पूर्ण सक्षम आहेत हे दाखवून दिल्याने कॉंग्रेसने केलेल्या आरोपांवर आता पडदा पडला आहे असे तानावडे म्हणाले. 

मुख्यमंत्री पर्रीकर हे दिल्लीतील "एम्स' इस्पितळातून गोव्यात परतले तेव्हाच्या व आताच्या आरोग्याच्या परिस्थितीत सुधारणा दिसून येत आहे का असे पत्रकारांनी विचारले असता तानावडे म्हणाले, ते स्वतःच्या वाढदिनीच या पुलांची पाहणी करण्यासाठी जाणार होते मात्र काही अडचणीमुळे ते 16 डिसेंबरला गेले. त्यांच्या या उपस्थितीमुळे कॉंग्रेसचे खरे रूप जनतेला कळून चुकले आहे. ते खासगी निवासस्थानी मंत्रिमंडळ बैठक तसेच अधिकाऱ्यांशी चर्चा केल्याबाबतही कॉंग्रेसने शंका उपस्थिती केली होती त्याला चपराक बसली आहे. 

उच्च न्यायालयात मुख्यमंत्र्यांच्या आरोग्यासंदर्भात याचिका दाखल झाल्याने मुख्यमंत्र्यांनी पुलांची पाहणी करण्याचा बहाणा केला का असे विचारले असता तानावडे यांनी सांगितले की, तसे काहीच नाही. ते नेहमीच राज्यातील कामांचा आढावा घेत होते. या याचिकेशी व त्यांनी केलेल्या पुलांच्या पाहणीप्रकरणाशी काहीच संबंध नाही. 

...मुख्यमंत्र्यांची भेट नाही 
कॉंग्रेसने मुख्यमंत्र्यांशी भेट घेण्यासाठी अनेकवेळा प्रयत्न केले, मात्र ती मिळाली नसल्याचा आरोप केला आहे. यावर उत्तर देताना भाजप प्रवक्ते सदानंद तानावडे म्हणाले, कॉंग्रेसने कधीच भेटीसाठी भाजपशी संपर्क साधला नाही. त्यांनी जर तेव्हा संपर्क साधला असता तर त्यांची भेट मुख्यमंत्र्यांबरोबर घालून देण्यात आली असती, मात्र आता त्यांनी विनंती केल्यास भेट दिली जाणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले. 

राफेल फसवणूकप्रकरणी निदर्शने 
राफेल विमाने खरेदीप्रकरणी भाजपविरोधात कॉंग्रेसने केलेले आरोप सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याने फेटाळले आहेत. कॉंग्रेसने जनतेची फसवणूक केली, त्याच्या निषेधार्थ देशभरात निषेध निदर्शने करण्यात येणार असल्याने गोव्यातही ती करण्यात येणार असून भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे गोव्यात येत आहेत. 20 डिसेंबरला उत्तर व दक्षिण जिल्हाधिकाऱ्यांना कॉंग्रेसचा निषेध करणारी निवेदने राष्ट्रपतींपर्यंत पोचवण्यासाठी भाजपतर्फे दिली जाणार आहेत, तर 21 रोजी पणजीत निषेध निदर्शने फेरीबोटीसमोर केली जाणार आहेत.

Web Title: congress makes politics of Manohar Pariikar s illness