काँग्रेस राहुलला पर्याय देणार मायावती, ममतांचा..?

वृत्तसंस्था
बुधवार, 25 जुलै 2018

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधानपदासाठी राहुल गांधी यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर आता काँग्रेसने अचानक नरमाईचे धोरण स्वीकारल्याचे दिसत आहे. 'भारतीय जनता पक्ष किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पाठिंबा नसलेल्या कोणत्याही उमेदवाराला पंतप्रधानपदासाठी आम्ही मान्यता देऊ', असे काँग्रेसच्या सूत्रांनी काल (मंगळवार) पत्रकारांना सांगितले. 

गेल्या डिसेंबरमध्ये काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वीच कार्यकारिणी समितीची पहिली बैठक घेतली. यामध्ये आगामी निवडणुकीत पंतप्रधानपदासाठी काँग्रेसचा चेहरा राहुल गांधी हेच असतील, यावर अधिकृत मोहोर उमटविण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांना रोखण्यासाठी काँग्रेसने विरोधी पक्षांची एकजूट करण्याचा प्रयत्न चालविला आहे. पंतप्रधानपदासाठी राहुल यांची एकतर्फी उमेदवारी जाहीर केल्याने काँग्रेसच्या संभाव्य मित्रपक्षांतून प्रतिक्रिया उमटल्या होत्या. लालूप्रसाद यादव यांचे चिरंजीव आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी लगेचच या घोषणेला विरोध केला होता. 'पंतप्रधानपदाच्या शर्यतीत विरोधी पक्षांतर्फे राहुल गांधी हेच एकमेव उमेदवार नाहीत', असे तेजस्वी यांनी सांगितले होते. 

यानंतर 'ममता बॅनर्जी किंवा मायावती यांच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीला तुम्ही पाठिंबा देणार का' या प्रश्‍नावर काँग्रेसने वरील उत्तर दिले. शिवाय, महिलांप्रति भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मत योग्य नसल्याची टीका काँग्रेसने केली आणि 'काँग्रेसमध्ये लवकरच अधिकाधिक महिला निर्णयप्रक्रियेत सामावून घेतल्या जातील', असेही स्पष्ट करण्यात आले. यासंदर्भात 'द वायर'वर वृत्त प्रसिद्ध झाले आहे. 

2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत न मिळाल्यास त्यांनाही पंतप्रधानपदाचा उमेदवार बदलावा लागेल, असा अंदाज काँग्रेसतर्फे वर्तविला जात आहे. त्यामुळे भाजपच्या संभाव्य समीकरणांमध्ये नसलेल्या उमेदवारांना पाठिंबा देण्यास काँग्रेसची हरकत नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Web Title: Congress may back Mayavati or Mamata Banerjee for PM in 2019