काश्‍मीरमध्ये काँग्रेसचा 'पीडीपी'ला पाठिंबा? 

वृत्तसंस्था
सोमवार, 2 जुलै 2018

श्रीनगर : भारतीय जनता पक्षाने (भाजप) मेहबुबा मुफ्ती यांच्या 'पीडीपी'चा पाठिंबा अचानक काढून घेतल्यानंतर जम्मू-काश्‍मीरमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीत काँग्रेसही आता संधी शोधत आहे. भाजपच्या धक्‍क्‍यानंतर मेहबुबा मुफ्ती यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आता 'पीडीपी'सोबत आघाडी करण्याच्या दिशेने पावले उचलण्यासाठी काँग्रेसच्या बैठका सुरू असल्याचे वृत्त काही संकेतस्थळांवर प्रसिद्ध झाले आहे. 

जम्मू-काश्‍मीरविषयी काँग्रेसच्या धोरण समितीची बैठक आज (सोमवार) दिल्लीत होणार आहे. या समितीच्या अध्यक्षस्थानी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग आहेत. शिवाय त्या समितीमध्ये माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम, ज्येष्ठ नेते कर्णसिंह, गुलाम नबी आझाद आणि जम्मू-काश्‍मीरच्या प्रभारी अंबिका सोनी यांचा समावेश आहे. याशिवाय, श्रीनगरमध्ये उद्या (मंगळवार) पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक आहे. आझाद आणि सोनी हे दोघेही त्या बैठकीस उपस्थित असतील. 

श्रीनगरमधील बैठकीमध्ये 'पीडीपी'शी आघाडी करण्याचा प्रस्ताव चर्चेस येऊ शकतो, असे सूत्रांनी सांगितल्याचे 'हिंदुस्थान टाईम्स'ने म्हटले आहे. 'एन. एन. व्होरा यांच्या जागी केंद्र सरकार नव्या राज्यपालाची नियुक्ती करेल, अशी शक्‍यता आहे. नवे राज्यपाल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असतील, अशीही दाट शक्‍यता आहे', असे काँग्रेसच्या सूत्रांचे म्हणणे आहे. अमरनाथची यात्रा संपल्यानंतर हा बदल होईल, असे अपेक्षित आहे. 

या निर्णयाद्वारे जम्मू-काश्‍मीरवर पकड मजबूत करण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत आहे, असेही काँग्रेसचे निरीक्षण आहे. दुसरीकडे, इतर पक्षांमधील नाराजांना हाताशी धरून राज्यात सरकार स्थापन करण्याचे प्रयत्न भाजपचे सुरू असल्याचा दावाही काँग्रेसने केला आहे. त्यामुळे 'पीडीपी'शी संपर्क साधून काँग्रेसने भाजपला रोखण्याचे प्रयत्न सुरू केल्याचे चित्र आहे. अर्थात, या दोन्ही पक्षांनी संभाव्य आघाडीविषयी काहीही भाष्य केलेले नाही.

Web Title: Congress may support PDP in Jammu Kashmir