Vidhan Sabha 2019 : महाराष्ट्राबाबत काँग्रेसची आज बैठक

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 26 September 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवार छाननीची त्याचप्रमाणे केंद्रीय निवडणूक समितीची बैठक  आज (ता. २६) होणार आहे. यामध्ये पक्षाच्या उमेदवार यादीला अंतिम रूप दिले जाईल, असे सांगितले जाते.

विधानसभा 2019 
नवी दिल्ली - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवार छाननीची त्याचप्रमाणे केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आज (ता. २६) होणार आहे. यामध्ये पक्षाच्या उमेदवार यादीला अंतिम रूप दिले जाईल, असे सांगितले जाते. दरम्यान, सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची चाचपणी काँग्रेसने सुरू केल्याचेही खात्रीलायक सूत्रांकडून कळते. 

साताऱ्याच्या जागेसाठी पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची चर्चा सुरू असल्याच्या वृत्तास काँग्रेसमधील उच्चस्तरीय सूत्रांनी दुजोरा दिला. कालपासून पृथ्वीराज चव्हाण दिल्लीत असून, आज त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. मात्र, साताऱ्यातील उमेदवारीबाबत स्वतः चव्हाण यांनी बोलण्याचे टाळले. सूत्रांच्या माहितीनुसार प्रदेश पातळीवरील नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी आग्रही आहेत; परंतु उदयनराजे भोसले यांच्याविरुद्धच्या या लढाईसाठी अद्याप खुद्द चव्हाण यांची मानसिक तयारी झाली नसल्याचे निरीक्षणही या सूत्रांनी नोंदवले. या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून पूर्ण पाठिंबा मिळेल काय, अशी साशंकता त्यांना असल्याचे बोलले जाते. 

या पार्श्‍वभूमीवर उद्याच्या छाननी समितीच्या आणि केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत विधानसभांसोबतच साताऱ्याबाबतही निर्णय होऊ शकतो. याआधी छाननी समितीच्या बैठकीत सुमारे ७० हून अधिक नावांवर शिक्कामोर्तब झाले आहे. उर्वरित नावांवर उद्या चर्चा होईल. काँग्रेसची उमेदवारांची यादी उशिरा जाहीर होईल, असे कळते. सत्ताधारी भाजप-शिवसेनेची उमेदवार यादी जाहीर झाल्यास त्या पक्षांच्या नाराजांनाही आयत्या वेळी उमेदवारी देण्याची रणनीतीही काँग्रेसने आखली आहे.

गांधी जयंतीला राहुल वर्ध्यात
काँग्रेसने दोन ऑक्‍टोबरला गांधी जयंतीदिनी कार्यक्रमांचे नियोजन केले आहे. याअंतर्गत राहुल गांधी दोन ऑक्‍टोबरला वर्धा येथे पदयात्रा काढतील, तर पक्षाध्यक्षा सोनिया गांधी दिल्लीत राजघाट या गांधीजींच्या समाधीपासून पदयात्रा काढतील. प्रियांका गांधी या सोनियांसोबत पदयात्रेत सहभागी होणार असल्याचे समजते.

काँग्रेस पवारांच्या पाठीशी
‘निवडणुका येताच विरोधी पक्षांच्या नेत्यांविरुद्ध ईडीचा ससेमिरा लागतो,’ अशा शब्दांत काँग्रेसने राज्य सहकारी बॅंक गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कारवाईविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पाठिंबा दिला आहे. यातून सत्ताधाऱ्यांच्या हाती काहीही लागणार नाही, असा दावा काँग्रेसचे प्रवक्ते राजीव त्यागी यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे राष्ट्रपिता म्हटल्याचीही काँग्रेसने जोरदार खिल्ली उडवली. भारतीयांना पुरेसे ज्ञान आणि विवेक आहे. त्यांना माहिती आहे की राष्ट्रपिता कोण आहे. भारतीयांनी कोणाला राष्ट्रपिता मानावे हे कोणीही बाहेरचा नेता, परदेशी व्यक्ती सांगू शकत नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress meeting on Maharashtra today