चर्चेसाठी काँग्रेसची शनिवारी बैठक

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि त्यांच्या कुटुंबीयांची ‘एसपीजी’ सुरक्षा व्यवस्था हटविल्याने संतप्त झालेला काँग्रेस पक्ष मोठ्या आंदोलनाच्या तयारीत आहे. या मुद्द्यासह महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट, बेरोजगारी, आर्थिक मुद्द्यांवर सरकारला घेरण्यासाठी शनिवारी (ता. १६) काँग्रेसची महत्त्वाची बैठक होणार आहे.

नवी दिल्ली - काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि त्यांच्या कुटुंबीयांची ‘एसपीजी’ सुरक्षा व्यवस्था हटविल्याने संतप्त झालेला काँग्रेस पक्ष मोठ्या आंदोलनाच्या तयारीत आहे. या मुद्द्यासह महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट, बेरोजगारी, आर्थिक मुद्द्यांवर सरकारला घेरण्यासाठी शनिवारी (ता. १६) काँग्रेसची महत्त्वाची बैठक होणार आहे. सर्व सरचिटणीस, प्रदेशाध्यक्ष, विधिमंडळ पक्षनेते तसेच संलग्न संघटनांच्या प्रमुखांनाही या बैठकीस हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

काँग्रेसच्या ‘वॉर रूम’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या १५, गुरुद्वारा रकाबगंज या कार्यालयात ही बैठक होणार असून, त्यात सोनियाही सहभागी होणार आहेत. काँग्रेसचे संघटना सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी या बैठकीसाठी सर्व नेत्यांना पत्र पाठविले आहे. बैठकीचा अजेंडा त्यात स्पष्ट करण्यात आलेला नाही; मात्र, वर्तमान परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. 

महाराष्ट्रात उत्पन्न झालेली राजकीय परिस्थिती आणि शिवसेनेसोबत जाण्यावरून काँग्रेसमध्ये असलेला वैचारिक गोंधळ, यावरही या बैठकीत चर्चा होऊ शकते. त्यासाठी राज्यस्तरीय नेत्यांनाही बैठकीत बोलावण्यात 
आले आहे. 

संसदेचे हिवाळी अधिवेशन १८ नोव्हेंबरपासून सुरू होणार असून, काँग्रेसने अलीकडेच वीसहून अधिक विरोधी पक्षांची बैठक बोलावली होती. त्यात आर्थिक समस्या, बेरोजगारीच्या मुद्द्यावर देशव्यापी आंदोलनाची सर्व पक्षांची सहमती झाली होती. त्या पार्श्‍वभूमीवर संसदेत आणि संसदेबाहेरही पक्षाची एकत्रित रणनीती व आंदोलनाबाबत या बैठकीत मंथन होऊ शकते, असे कळते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: congress meeting at saturday for discussion politics