काँग्रेसच्या मंत्र्याकडूनच सिद्धूच्या राजीनाम्याची मागणी

वृत्तसंस्था
रविवार, 2 डिसेंबर 2018

पाकिस्तान दौऱ्यावरून वादाच्या भोवऱ्यात सापडलेले पंजाबचे मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांनी राजीनामा द्यावा, असा सल्ला पंजाबचे कॅबिनेट मंत्री आणि ज्येष्ठ कॉंग्रेस नेते तृप्त राजिंदरसिंग बाजवा यांनी दिला आहे.

चंडीगड: पाकिस्तान दौऱ्यावरून वादाच्या भोवऱ्यात सापडलेले पंजाबचे मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांनी राजीनामा द्यावा, असा सल्ला पंजाबचे कॅबिनेट मंत्री आणि ज्येष्ठ कॉंग्रेस नेते तृप्त राजिंदरसिंग बाजवा यांनी दिला आहे.

ते म्हणाले, पंजाबचे कॉंग्रेसचे नेते मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग आहेत. जर अमररिंदरसिंग यांना ते मानत नसतील तर आणि ते स्वत:ला त्यांच्यापेक्षा मोठे समजत असतील तर सिद्धू यांनी कॅबिनेटचा राजीनामा द्यायला हवा.

दरम्यान, नवज्योसिंग सिद्धू यांनी आज कालच्या विधानावर कोलांटउडी घेत राहुल गांधी यांनी आपल्याला पाकिस्तानला जाण्यास सांगितले नव्हते, असे ट्‌विट केले आहे. पंतप्रधान इम्रान खान यांच्या वैयक्तिक निमंत्रणावरून पाकिस्तानला गेलो, असे सिद्धू म्हणाले. काल सिद्धू यांनी आपण राहुल गांधी यांच्या सांगण्यावरून पाकिस्तानला गेल्याचे म्हटले होते.

सिद्धूच्या भूमिकेवर नाराज असलेले बाजवा म्हणाले, राहुल गांधी हे संपूर्ण पक्षाचे, अमरिंदरसिंग, सिद्धू आणि माझे कर्णधार आहेत. मात्र, पंजाबमध्ये कॉंग्रेस आणि सरकारचे नेते हे कॅप्टन अमरिंदरसिंगच आहेत आणि राहतील. ज्या पद्धतीने सिद्धू यांनी अमरिंदरसिंग यांना कॅप्टन न मानून अपमान केला आहे, ते पाहता त्यांनी मंत्रिमंडळातून बाहेर पडावे.

Web Title: Congress minister Tripat Rajinder Singh demands his resignation