रायबरेलीच्या काँग्रेस आमदारांकडून राम मंदिरासाठी लाखोंचा निधी

टीम ई सकाळ
Tuesday, 9 February 2021

रायबरेलीत आलेल्या राम जन्मभूमी तिर्थक्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांच्याकडे आदिती सिंह यांनी निधी सुपूर्द केला आहे. यासाठी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

नवी दिल्ली - काँग्रेसच्या बंडखोर आमदार आदिती सिंह त्यांच्या पक्षविरोधी वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. आता आदिती सिंह यांनी राम मंदिर उभारणीसाठी मोठ्या रकमेचं दान केलं असून त्याची चर्चा होत आहे. रायबरेलीच्या आमदार आदिती सिंह यांनी राम मंदिरासाठी 51 लाख रुपयांची देणगी दिली आहे. 

रायबरेलीत आलेल्या राम जन्मभूमी तिर्थक्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांच्याकडे आदिती सिंह यांनी निधी सुपूर्द केला आहे. यासाठी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. तेव्हा चंपत राय यांनी म्हटलं की, आयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी घरोघरी जाऊन निधी गोळा केला जाईल. रायबरेलीत येण्याचा उद्देश कार्यकर्त्यांशी चर्चा करणं आणि मोहिम पुढे नेणं हाच होता. राम मंदिराच्या कामात जे कोणी हातभार लावतील त्यांचं स्वागत आहे असंही त्यांनी म्हटलं. 

राम मंदिराच्या बांधकामासाठी 51 लाखांची देणगी दिल्यानंतर आदिती सिंह यांनी म्हटं की, माझ्या टीमच्या आणि समर्थकांच्यावतीने मी योगदान दिलं आहे. प्रत्येकानं यात आपल्या परीने योगदान दिलं आहे असंही त्यांनी सांगितलं.

हे वाचा - भाऊ मुख्यमंत्री आणि बहिणीने स्थापन केला नवा पक्ष; सोशल मीडियावरून टीका

आदिती सिंह यांनी दोनच दिवसांपूर्वी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर टीका केली होती. त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ राजकीय गुरु असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर सोनिया गांधी यांच्यावर त्यांच्या मतदार संघातील कामांवरून निशाणा साधला होता. आदिती सिंह यांनी म्हटलं होतं की, गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात सोनिया गांधी फक्त दोनच वेळा रायबरेलीला आल्या. त्यात 2019 मध्ये निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी एकदा रायबरेलीत आल्या होत्या. जनतेनंच त्यांना निवडून दिलं आहे असंही त्यांनी यावेळी म्हटलं होतं.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress MLA Aditi Singh donates for construction of Ram Temple