काँग्रेसचे दोन असंतुष्ट आमदार भाजपच्या वाटेवर

काँग्रेसचे दोन असंतुष्ट आमदार भाजपच्या वाटेवर

बंगळूर - एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला जोर येत असतानाच सर्वच पक्षांत पक्षांतराची लाट सुरू झाली आहे. सत्ताधारी काँग्रेस, धजदसह विरोधी पक्ष असलेल्या भाजपलाही ही डोकेदुखी झाली आहे. काँग्रेसचे असंतुष्ट आमदार रमेश जारकीहोळी व बी. नागेंद्र भाजपच्या वाटेवर आहेत; तर भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी मंत्री बाबूराव चव्हाण व भाजपचे गुरूमिटकलचे नेते शामराव पॅटी सोमवारी (ता.१८) राहुल गांधी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या मेळाव्यात काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे समजते. 

उमेश जाधव यांनी अलीकडेच आमदारपदाचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला आहे. त्यांना काँग्रेसचे नेते मल्लिकार्जून खर्गे यांच्याविरुध्द उमेदवारी देण्यात येणार असल्याचे समजते. यावरूनच चव्हाण यांचे पक्ष नेत्यांशी मतभेद झाल्याचे समजते. हासनमधील काँग्रेसचे जेष्ठ नेते व माजी मंत्री ए. मंजू यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या वर्तनाला कंटाळून व हासन मतदारसंघ धजदला सोडल्याच्या निषेधार्थ भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. ही बातमी समजताच माजी मुख्यमंत्री सिध्दरामय्या त्यांचे मनपरिवर्तन करण्यास सरसावले आहेत. मात्र मंजू यांनी शनिवारी सकाळी आमदार प्रितम गौड यांच्या निवासस्थानी जाऊन भाजपमध्ये प्रवेश करण्यासंदर्भात कार्यकर्ते व नेत्यांशी चर्चा केली. मंजू यांनी भाजपात प्रवेश केल्यास त्यांना हासन मतदारसंघात भाजपची उमेदवारी निश्‍चित आहे.

याबाबत मंजू म्हणाले, ‘जिल्ह्यातील लोक धजद व देवेगौडा कुटुंबियांच्या राजकारणाला कंटाळले आहेत. त्यामुळे काय करावयाचे याचा निर्णय मी लोकांवर सोडला आहे. ते सांगतील तसे मी करणार आहे.’

बी. नागेंद्र, जारकीहोळींची दिल्लीत चर्चा
काँग्रेसच्या विरोधात उघड बंडाचा पवित्रा घेतलेले रमेश जरकीहोळी व बी. नागेंद्र यांनी लोकसभा निवडणुकीनंतर भाजपत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. जारकीहोळी व नागेंद्र सध्या दिल्लीत असल्याचे समजते. भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांशी त्यांनी आपल्या पक्ष प्रवेशाविषयी बोलणी सुरू केली 
असल्याचे समजते. 

आमदार नागेंद्र यांचे बंधू व्यंकटेश प्रसाद यांना बळ्ळारी लोकसभा मतदारसंघातून भाजपची उमेदवारी देण्यात येणार असल्याचे समजते. मंड्या लोकसभा मतदार संघातही नेत्यांपेक्षा काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये असंतोष पसरला आहे. बहुसंख्य कार्यकर्ते पक्षाच्या निर्णयाच्या निषेधार्थ सुमलता अंबरीश यांचा प्रचार करण्याच्या तयारीत आहेत. प्रसंगी पक्षाच्या कारवाईलाही सामोरे जाण्याची त्यांनी तयारी ठेवली असल्याचे समजते. 

डॅनिश अलींचा धजदला रामराम
राज्यातील युती सरकारच्या समन्वय समितीचे सदस्य व धजदचे राष्ट्रीय मुख्य सचिव डॅनिश अली यांनी धजदला रामराम करून मायावती यांच्या नेतृत्वाखालील बहुजन समाजवादी पक्षात शनिवारी प्रवेश केला. उत्तर प्रदेशात धजदची म्हणावी तशी संघटना नाही. त्यामुळे या पक्षाच्या संघटनेत माझे म्हणावे तसे योगदान नाही, असे सांगून डॅनीश अली यांनी आपल्या जन्मभूमीत प्रभावी असलेल्या पक्षात प्रवेश करून राजकीय कारकिर्द करण्याचा उद्देश असल्याचे स्पष्ट केले. डॅनिश अली यांच्यासाठी उत्तरप्रदेशात एक मतदारसंघ सोडून देण्याची विनंती धजदने मायावती यांना केली होती. परंतु मायावती यांनी ती मान्य केली नाही. त्यामुळे अली यांनी थेट बसपामध्येच प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com