‘सेंट्रल व्हिस्टा’ म्हणजे पैशांची उधळपट्टी

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 9 February 2021

नवीन लोकसभा-राज्यसभा इमारती बनविताना केवळ राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचा पुतळा हलविणेच नव्हे तर सगळा संसदीय इतिहास पुसून टाकण्याचा अश्‍लाघ्य प्रयत्न चालू आहे.

नवी दिल्ली - देश कमालीच्या आर्थिक हलाखीच्या परिस्थितीतून जात असताना नवीन संसद व सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाच्या नावाखाली हजारो कोटी रुपयांची होणारी उधळपट्टी ताबडतोब थांबवावी, अशी मागणी कॉंग्रेसचे खासदार कुमार केतकर यांनी आज राज्यसभेत केली. 

नवीन संसद भवन व पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महत्वाकांक्षी सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पावर कॉंग्रेसने प्रथमच संसदेत टीकास्त्र सोडताना, ‘ही २० हजार कोटी रूपयांचीच उधळपट्टी नाही तर स्वतंत्र भारताचा संसदीय इतिहासच उधळला जात आहे,’ असे म्हटले आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

केतकर यांनी शून्य प्रहरात मराठीतून भाषण करताना सांगितले की, दिल्लीत सेंट्रल व्हिस्टाचा प्रकल्प २० हजार कोटी रूपयांपेक्षा जास्त खर्च करून अमलात आणला जात आहे आणि संसद भवनासारख्या ‘हेरीटेज’ व ऐतिहासिक इमारतीचा सगळा वारसा पुसून टाकण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नवीन लोकसभा-राज्यसभा इमारती बनविताना केवळ राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचा पुतळा हलविणेच नव्हे तर सगळा संसदीय इतिहास पुसून टाकण्याचा अश्‍लाघ्य प्रयत्न चालू आहे. ज्या संसदेत पंडित नेहरू आणि लालबहादूर शास्त्रींनी देशाचा गौरवशाली इतिहास उभा केला, ज्या ठिकाणी इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचा पूर्ण पराभव करून बांगलादेशनिर्मिती बरोबर अवघ्या दक्षिण आशियाचा इतिहास व भूगोल बदलला आणि ज्याबद्दल माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींनी त्यांचा याच वास्तूत गौरव केला, त्याच गौरवशाली वास्तूला अडगळीत टाकण्याचा हा प्रयोग दिल्लीतच चालू आहे, असेही टीकास्त्र त्यांनी सोडले. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

‘स्मार्ट सीटी’ संकल्पनेद्वारे शहरे सुधारतील, अशी अपेक्षा होती. परंतु स्मार्ट बनू पाहणाऱ्या बहुतांश शहरांमध्ये सौंदर्य तर सोडाच, पण ही शहरे विद्रूप आणि विकृत होत आहेत. ‘स्मार्ट सिटी’ च्या नावाखाली काही जुने प्रकल्प डागडुजी करून नवे भासविले जात आहेत.
- कुमार केतकर,  काँग्रेस खासदार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress MP Kumar Ketkar Rajya Sabha New Parliament and Central Vista