Congress President Poll : ‘एक व्यक्ती एक पद’साठी राहुल ठाम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Congress Party President election rahul gandhi Ashok Gehlot

Congress President Poll : ‘एक व्यक्ती एक पद’साठी राहुल ठाम

नवी दिल्ली : ‘एक व्यक्ती एक पद' नियमाची कटाक्षाने अंमलबजावणी करण्याच्या राहुल गांधी यांच्या स्पष्टोक्तीनंतर काँग्रेस पक्षाध्यक्षपदाच्या निवडणुकीतील संभाव्य उमेदवार अशोक गेहलोत यांच्यावर राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदाचा मोह सोडण्यासाठी दबाव वाढला आहे. ‘दोन पदांवर राहून न्याय देता येणार नाही,‘ असे म्हणत गेहलोत यांनीही नरमाईचा सूर आळवला. एवढेच नव्हे तर राहुल लढणार नसल्यास आपण अर्ज दाखल करू, असेही नमूद केले. बुधवारपर्यंत गेहलोत यांनी मुख्यमंत्रिपदी कायम राहूनही पक्षाध्यक्षपद सांभाळता येऊ शकते असा सूर लावला होता. ‘एक व्यक्ती एक पद’ नियम केवळ नियुक्तीच्या पदांसाठी असून अध्यक्षपदासाठी निवडणूक खुली होत आहे, असा युक्तिवाद करीत त्यांनी मुख्यमंत्रिपद सोडणार नसल्याचे अप्रत्यक्ष संकेत दिले होते.

एवढेच नव्हे तर सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर त्यांनी पक्षाध्यक्षपदासाठी राहुल यांना पुन्हा आवाहन करणार असल्याचे सांगितले होते. परंतु, दोन्ही पदांवर राहण्याच्या गेहलोत यांच्या भूमिकेला काँग्रेसमधूनच विरोध झाला. पक्षाध्यक्षपदी असणारी व्यक्ती दुसऱ्या पदावर राहू शकत नाही, या दिग्विजयसिंह यांच्या वक्तव्यातून हा विरोध समोर आला. या पार्श्वभूमीवर ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान राहुल यांच्या भेटीसाठी गेहलोत हे गुरुवारी केरळमध्ये जाऊन धडकले. त्यावेळी त्यांचे मुख्यमंत्रिपद हा चर्चेचा केंद्रबिंदू राहील असे कयास लावले जात होते. परंतु राहुल यांनी केरळमध्ये पत्रकारांशी बोलताना 'एक व्यक्ती एक पद' नियमाचे पालन होईल असे स्पष्ट केले. उदयपूरच्या चिंतन शिबिरात झालेल्या निर्णयाचा त्यांनी जाणीवपूर्वक केलेला उल्लेख हा गेहलोत यांना इशारा मानला जात आहे.

एर्नाकुलम जिल्ह्यातल्या करुकुट्टी येथे राहुल यांची पत्रकार परिषद झाली. ‘अध्यक्षपदाबद्दल आपला निर्णय बदललेला नाही,’ असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे ते निवडणूक रिंगणात नसणार हे पुन्हा स्पष्ट झाले. आता गेहलोत हेच गांधी कुटुंबाच्या पसंतीचे उमेदवार राहतील, हे सुद्धा निश्चित झाले आहे. दरम्यान, या निवडणुकीची अधिसूचना गुरुवारी जारी झाली असून २४ सप्टेंबर ३० सप्टेंबरपर्यंत इच्छुकांना उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. जी-२३ गटातर्फे पंजाबमधील मनीष तिवारी यांनीही उमेदवारीची तयारी सुरू केल्याचे सांगितले जात असून दिग्विजय सिंह यांचेही नाव उमेदवारीच्या चर्चेत आहे.

वल्लभ यांची थरूर यांच्यावर टीका

काँग्रेसचे प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी शशी थरूर यांच्यावर टीकेचा भडिमार केला आहे. सोनिया गांधी रुग्णालयात दाखल असताना पत्र धाडण्याचा सपाटा हीच थरूर यांची काय ती महत्त्वाची कामगिरी आहे, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. आपले मत पक्षप्रवक्ता म्हणून नव्हे तर सामान्य काँग्रेस कार्यकर्त्याच्या भूमिकेतून असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

...तर मुख्यमंत्रिपद सोडावे लागेल: राहुल

कोची : भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधला. ‘‘आपण आजही घेतलेल्या भूमिकेवर ठाम आहोत. आपण निवडणूक लढणार नाहीत’’, अशा शब्दांत भूमिका मांडताना गेहलोत अध्यक्ष होत असतील तर त्यांना मुख्यमंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल, असा इशारेवजा सूचना केली.

पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी यांनी ‘वन मॅन, वन पोस्ट’ या भूमिकेचे समर्थन केले. ते म्हणाले, की अध्यक्षपद हे केवळ संघटनात्मक पद नसून ते वैचारिक पद आहे. अध्यक्षपद स्वीकारणाऱ्यांनी आपल्यावर एक ऐतिहासिक जबाबदारी येत असल्याचे लक्षात ठेवायला हवे. अध्यक्षपद हे एका वैचारिक गटाचा, विश्‍वासाचा व भारताच्या दृष्टिकोनाचे प्रतिनिधित्व करते, असेही त्यांनी नमूद केले.

विधानसभा अध्यक्षांच्या नावाची चर्चा

गेहलोत यांचे नाव पुढे आल्यानंतर राजस्थानात नेतृत्वबदलाची चर्चा पक्षात सुरू झाली. तरुण नेते सचिन पायलट मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक आहेत, पण गेहलोत यांचा त्यांना कट्टर विरोध आहे. राजस्थानचे नेतृत्व कोणाकडे असावे हे आमदार ठरवतील असे गेहलोत यांनी म्हटले आहे. विधानसभेचे अध्यक्ष असलेले सी. पी. जोशी यांचेही नाव अचानक मुख्यमंत्री पदासाठी पुढे आले आहे.

Web Title: Congress Party President Election Rahul Gandhi Ashok Gehlot

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..