स्वातंत्र्य लढ्यात काँग्रेसचं मोठं योगदान होतं..; असं का म्हणाले अमित शाह? Amit Shah | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Karnataka Assembly Election 2023

काँग्रेस पक्ष कोणत्याही विचारसरणीनं जन्माला आलेला नाही, असा दावाही शाह यांनी केला.

Amit Shah : स्वातंत्र्य लढ्यात काँग्रेसचं मोठं योगदान होतं..; असं का म्हणाले अमित शाह?

Karnataka Assembly Election 2023 : केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह (Amit Shah) कर्नाटक दौऱ्यावर आले आहेत. यावेळी बंगळुरूमध्ये त्यांनी काँग्रेसवर (Congress) जोरदार हल्लाबोल केला.

शाह म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत काँग्रेसची निश्चितच महत्त्वाची भूमिका आहे. काँग्रेस हे स्वातंत्र्य मिळवण्याचं व्यासपीठ होतं, त्यामुळंच लोक त्यात सामील होत होते. आज काँग्रेस कुटुंबव्यवस्थेत गुरफटलेली आहे. काँग्रेसची अंतर्गत लोकशाही व्यवस्था संपुष्टात आलीये. आमच्या पक्षात लोकशाही पद्धतीनं निवडणुका होतात. अध्यक्षांचे वडील कधीच अध्यक्ष होत नाहीत, असा टोलाही त्यांनी काँग्रेसला लगावला.

काँग्रेस पक्ष कोणत्याही विचारसरणीनं जन्माला आलेला नाही, असा दावाही शाह यांनी केला. काँग्रेस पक्षाकडं ना सांस्कृतिक विचारसरणी होती, ना अर्थव्यवस्थेबाबतची विचारसरणी, ना देशाच्या निर्मितीबाबतची विचारसरणी. 2004 ते 2014 या काळात एकही नवीन धोरण काँग्रेसनं तयार केलं नाही. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान आणि बिहार या राज्यांमध्ये दीर्घकाळ काँग्रेसची सत्ता होती. मात्र, इथं त्यांनी काहीच केलं नाही. आता चारही राज्यात भाजपचं सरकार आलं असून मोठ्या प्रमाणात विकास होत आहे.

'धर्माच्या आधारावर भेदभाव करू नका'

भाजपच्या विचारसरणीचा पहिला आधारस्तंभ सांस्कृतिक राष्ट्रवाद असल्याचं अमित शहा म्हणाले. भारत वगळता जगातील सर्व देश भू-राजकीय देश आहेत तर आपला देश भू-सांस्कृतिक देश आहे. विकासावर पहिला हक्क वंचित आणि गरिबांचा आहे. आम्ही धर्माच्या आधारावर कोणताही भेदभाव करत नाही, असंही शाह म्हणाले.