मोदींनी देशातील बँकिंग व्यवस्थेचे वाटोळे केले : राहुल गांधी

वृत्तसंस्था
मंगळवार, 17 एप्रिल 2018

''पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अच्छे दिन येतील, असे सांगितले होते. पण कोणाचे अच्छे दिन आले. देशातील फक्त 15 लोकांना अच्छे दिन आले आहेत. देशातील गरीब, मजूर, सामान्य लोकांचे बुरे दिनच आहेत''.

- राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष

नवी दिल्ली : देशातील काही भागात मोठा चलन तुटवडा झाल्याचे समोर आले आहे. या चलन तुटवड्याच्या मुद्यावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. ते म्हणाले, ''नीरव मोदी 30 हजार कोटी रूपये घेऊन देशातून पळून गेला. मात्र, आपले पंतप्रधान त्यावर काहीच बोलत नाहीत. मोदींनी देशातील बँकिंग व्यवस्थेचे वाटोळे केले''.

Modi

राहुल गांधी सध्या अमेठीच्या दौऱ्यावर आहेत. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी पंतप्रधानांवर टीकास्त्र सोडले. राहुल गांधी म्हणाले, आपल्या प्रत्येकाच्या खिशातून 500-1000 रूपयांच्या नोटा काढल्या आणि त्या नीरव मोदीला दिल्या. एकीकडे नीरव मोदी 30 हजार कोटी रूपये घेऊन पळून गेला. त्यावर पंतप्रधान काहीच बोलत नाहीत. पंतप्रधान मोदींनी देशातील बँकिंग व्यवस्थेचे वाटोळे केले आहे. याशिवाय राहुल गांधींनी मोदींच्या 'अच्छे दिन'ची खिल्ली उडवली. ते म्हणाले, अच्छे दिन येतील, असे मोदींनी सांगितले होते. पण कोणाचे अच्छे दिन आले. देशातील फक्त 15 लोकांना अच्छे दिन आले आहेत. देशातील गरीब, मजूर, सामान्य लोकांचे बुरे दिनच आहेत, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

दरम्यान,  देशातील काही राज्यांमध्ये जाणवणाऱ्या रोख रकमेच्या तुटवड्यावर तोडगा काढण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आज (मंगळवार) एक समिती स्थापन केली. 'काही भागांमधून अचानक आणि नेहमीपेक्षा जास्त व्यवहार झाल्यामुळे काही ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे', असे निरीक्षण केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नोंदविले. 

Web Title: Congress President Criticizes PM Narendra Modi on Banking System