दरवाढ, बेरोजगारीवर मोदी मौनात : राहुल गांधी

Congress
Congress

नवी दिल्ली : भाजप म्हणत होते 70 वर्षांत जे झाले नाही, ते आम्ही चार वर्षांत करून दाखवतो. ते खरेच ठरले आहे. आता प्रत्येक नागरिक एकमेकांशी लढत आहे. प्रत्येक ठिकाणी जाती-जातीत भांडणे लावण्याचे काम सुरु आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर सतत वाढत आहेत. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी एक शब्द बोलत नाही. सिलिंडरचे दर चारशे रुपयांहून आठशेवर गेले आहेत. देशाला जी गरज आहे, त्यावर ते एक शब्द बोलत नाहीत, अशी जोरदार टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली.

केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारच्या विरोधात इंधन दरवाढीच्या मुद्यावर सर्व विरोधी पक्षांना एकवटण्याचा निर्धार काँग्रेस पक्षाने केला असून, आज (ता.10) देशभरात 'भारत बंद'ची हाक दिली आहे. सतत वाढणाऱ्या पेट्रोलच्या किंमतींवरून मोदी सरकारला लक्ष्य करत काँग्रेससह 21 विरोधी पक्षांनी बंद पुकारला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजघाट येथे जाऊन दर्शन आंदोलनाला सुरवात केली. मनमोहनसिंग यांच्यासह सोनिया गांधी, शरद पवार, शरद जोशी आदी विरोधी पक्षांचे नेते आंदोलनात सहभागी झाले आहेत. 

राहुल गांधी म्हणाले, ''2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर त्यांनी देशातील जनतेशी, युवकांशी, शेतकऱ्यांना अनेक आश्वासने दिली होती. कोठेही गेले तरी आश्वासने देत होते. त्यावर नागरिकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांना निवडून दिले. पण, चार वर्षे झाली लोकांना आता दिसायला लागले आहे भाजपने काय करून ठेवले होते.  शेतकऱ्यांना, बेरोजगारांना मार्ग दिसत नाही. फक्त काही उद्योगपतींना मार्ग मोकळे करून दिले आहेत. पंतप्रधानांनी नोटाबंदी करून तुमचे पैसे लुटले. नोटाबंदी का केली हे अजूनही देश समजू शकलेले नाही. आज सगळे विरोधी पक्ष एक आले आहेत. आमच्या सर्वांची विचारधारा एक आहे. आम्ही सगळे एकत्र येऊन भाजपचा पराभव करणार आहोत. देशातील जनतेच्या मनात असलेले दुःख आमच्या सर्वांच्या मनात आहे. आम्ही सर्वजण एकत्र येऊन भाजपला हटविण्याचे काम करू.''

माध्यमांनी मोकळेपणाने लिहावे
माध्यमांना आजकाल मोकळेपणाने लिहिता येत नाही. पण, देशातील जनता तुमच्यासोबत आहे. तुम्ही मोकळेपणाने लिहा, कोणाला घाबरू नये, असे राहुल गांधीनी आवर्जुन सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com