गडकरीजी प्रत्येक भारतीय 'हाच' प्रश्न विचारतोय: राहुल गांधी

वृत्तसंस्था
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटले आहे, की गडकरीजी तुम्ही जबरदस्त प्रश्न विचारला. आज प्रत्येक भारतीय नागरिक हाच प्रश्न विचारत आहे, कुठे आहेत नोकऱ्या? प्रत्येक भारतीयाला हाच प्रश्न आहे. 

नवी दिल्ली - आरक्षण मिळाले, तरी नोकऱ्याच उपलब्ध नाहीत असे वक्तव्य करणारे केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लक्ष्य करत गडकरीजी प्रत्येक भारतीय हाच प्रश्न विचारत आहेत, असे म्हटले आहे.

राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटले आहे, की गडकरीजी तुम्ही जबरदस्त प्रश्न विचारला. आज प्रत्येक भारतीय नागरिक हाच प्रश्न विचारत आहे, कुठे आहेत नोकऱ्या? प्रत्येक भारतीयाला हाच प्रश्न आहे. 

मराठा समाजाला आरक्षण मिळाले, तरी नोकऱ्याच उपलब्ध नाहीत. बॅंकेत इलेक्‍ट्रॉनिक्‍स यंत्रणेचा वापर वाढला आहे. यामुळे तेथेही नोकऱ्या कमी झाल्या आहेत. सरकारी नोकरभरतीही बंद आहे. आरक्षणाचा फायदा फक्‍त शिष्यवृत्तीसाठी मिळेल, असे नितीन गडकरी यांनी नुकतेच म्हटले होते. यावरून काँग्रेसने त्यांना लक्ष्य केले आहे.

राहुल गांधी यांनी यापूर्वीही अनेकवेळा केंद्र सरकारवर बेरोजगारीच्या मुद्द्यावरून लक्ष्य केले आहे. मोदींनी दोन कोटी युवकांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. पण, तसे काहीच झालेले नाही, असा आरोप राहुल यांनी यापूर्वीही केलेला आहे. काँग्रेसच्या कार्यकारी समितीच्या बैठकीतही बेरोजगारी आणि भ्रष्टाचारावर चर्चा करण्यात आली. देशभरात प्रचाराचा हा मुद्दा बनविण्यात येणार असल्याचेही काँग्रेसकडून सांगण्यात आले.

Web Title: Congress President Rahul Gandhi mocks Nitin Gadkari over where are the jobs statement