नाणार प्रकल्पाला राहुल गांधींचा विरोध 

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 29 एप्रिल 2018

जैतापूर आणि नाणारमध्ये फरक 
कोकणातील जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला पर्यावरणाच्या हानीच्या कारणामुळे विरोध असताना हा प्रकल्प कॉंग्रेसच्या सत्ताकाळात मार्गी लावण्याचा प्रयत्न झाला होता. आता नाणार प्रकल्पाबाबत कॉंग्रेसने विरोधी भूमिका घेतली असल्याबद्दल विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना अशोक चव्हाण यांनी दोन्ही प्रकल्पांमध्ये फरक असल्याचा दावा केला. जैतापूर प्रकल्पात कोणाचेही विस्थापन आणि नुकसानही झाले नव्हते. नाणारमध्ये मात्र मोठ्या प्रमाणावर लोकांचे विस्थापन होणार असल्यामुळे पक्षाचा विरोध असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले; तर नाणार प्रकल्पामुळे आठ हजारांहून अधिक लोकांना विस्थापित व्हावे लागणार असल्याचे वालम यांनी सांगितले. 

नवी दिल्ली : राजकीय संघर्षाचे केंद्र बनलेल्या कोकणातील नाणार रिफायनरी प्रकल्पाला कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी विरोध दर्शविला आहे. कोकण रिफायनरी प्रकल्प विरोधी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळासमवेत आज दिल्लीत झालेल्या चर्चेनंतर राहुल गांधींनी "हा प्रकल्प होऊ नये,' अशी भूमिका घेतली. या संदर्भात स्थानिक जनमताच्या आढाव्यासाठी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे दोन मे रोजी (बुधवार) राजापूरला जाणार आहेत. 

नाणार प्रकल्प रेटण्याचा सरकारचा प्रयत्न आणि स्थानिक जनतेचा असलेला विरोध याबाबत प्रकल्प विरोधी संघर्ष समितीचे प्रमुख अशोक वालम यांच्यासह सात जणांच्या शिष्टमंडळाने राहुल गांधींची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, अशोक चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, खासदार हुसेन दलवाई, माजी खासदार भालचंद्र मुणगेकर, कॉंग्रेसच्या कोकणातील आमदार हुस्नाबानू खलिफे यांच्यासह कॉंग्रेस नेते उपस्थित होते. 

अशोक चव्हाण यांनी सांगितले, की नाणार प्रकल्पाला असलेल्या विरोधाबाबत शिष्टमंडळाने मांडलेले म्हणणे राहुल गांधींनी ऐकून घेतले. प्रकल्पामुळे कोकणाची होणारी हानी, विस्थापनाबद्दल चिंता व्यक्त करताना राहुल यांनी "हा प्रकल्प थांबवावा' या जनतेच्या भावनेशी सहमती व्यक्त केली; तसेच मदतीची ग्वाही दिली. या प्रकल्पासाठी पंधरा हजार एकर जमिनीचे संपादन सुरू असून,प्रकल्पामुळे आंबा, काजूची लाखो झाडे नष्ट होणार आहेत;तसेच या भागातील मच्छिमारी व्यवसायही उद्‌ध्वस्त होण्याची भिती आहे. प्रकल्पाची अधिसूचना रद्द केल्याचे शिवसेनेचे उद्योगमंत्री म्हणतात आणि अशी अधिसूचना रद्द करण्याचे अधिकार उद्योगमंत्र्यांना नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात, अशी टीका अशोक चव्हाण यांनी केली. 

नाणार प्रकल्पामुळे कोकणात एक लाख रोजगार निर्माण होणार असल्याचे सरकारचे म्हणणे संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक वालम यांनी फेटाळून लावले. रत्नागिरी जिल्ह्यातील फळबागा, मच्छीमारी या उद्योगातून एक लाखाहून अधिक लोकांना रोजगार दिला जातो आहे. त्यामुळे या प्रकल्पाची आवश्‍यकता नाही. भूसंपादनाला सत्तर टक्के लोकांचा विरोध, 14 ग्रामपंचायतींचे प्रकल्पाविरोधातील ठराव, 95 टक्के असहमती पत्रे तसेच संयुक्त मोजणीलाही विरोध यातून स्थानिक जनतेने प्रकल्प होऊ देणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला असल्याचे अशोक वालम यांनी या वेळी सांगितले. 

जैतापूर आणि नाणारमध्ये फरक 
कोकणातील जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला पर्यावरणाच्या हानीच्या कारणामुळे विरोध असताना हा प्रकल्प कॉंग्रेसच्या सत्ताकाळात मार्गी लावण्याचा प्रयत्न झाला होता. आता नाणार प्रकल्पाबाबत कॉंग्रेसने विरोधी भूमिका घेतली असल्याबद्दल विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना अशोक चव्हाण यांनी दोन्ही प्रकल्पांमध्ये फरक असल्याचा दावा केला. जैतापूर प्रकल्पात कोणाचेही विस्थापन आणि नुकसानही झाले नव्हते. नाणारमध्ये मात्र मोठ्या प्रमाणावर लोकांचे विस्थापन होणार असल्यामुळे पक्षाचा विरोध असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले; तर नाणार प्रकल्पामुळे आठ हजारांहून अधिक लोकांना विस्थापित व्हावे लागणार असल्याचे वालम यांनी सांगितले. 

Web Title: Congress President Rahul Gandhi oppose Nanar Rifinary project