Loksabha 2019 : दिल्लीत भाजपला झटका; खासदाराचाच काँग्रेसमध्ये प्रवेश

वृत्तसंस्था
बुधवार, 24 एप्रिल 2019

उदित राज यांनी सनदी सेवेचा राजीनामा देऊन "भारतीय न्याय पक्षा'ची स्थापना केली होती. मात्र, 2009 मध्ये ते पराभूत झाले. 2014 च्या निवडणुकीपूर्वी त्यांनी आपला पक्ष भाजपच्या दावणीला बांधला व मोदी लाटेत ते दिल्लीतून निवडूनही आले. मात्र, काही काळातच त्यांचा भाजपबद्दल भ्रमनिरास झाल्याचे सांगितले जाते.

नवी दिल्ली : ऐन निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला असून, वायव्य दिल्लीतील खासदार डॉ. उदित राज यांनी आज (बुधवार) काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. दिल्लीतून तिकीट जाहीर न झाल्याने वैतागून त्यांनी भाजपला रामराम केल्याचे सांगण्यात येत आहे.

'भाजप दलितांना धोका देणार नाही, अशी मला आशा आहे,' असे संतप्त उद्‌गार उदित राज यांनी काढल्यानंतर आज त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. एखाद्या खासदाराचे तिकीट कापायचे असेल, तर त्या मतदारसंघातील उमेदवाराची घोषणाच लांबवत नेऊन त्यांचा अंत पाहणे व त्यांनी स्वतःहूनच शर्यतीतून बाहेर पडल्याचे जाहीर करण्यासाठी डावपेच खेळणे... डॉ. मुरली मनोहर जोशी, सुमित्रा महाजन या दिग्गज नेत्यांवर भाजपच्या नव्या नेतृत्वाने कथितरीत्या केलेल्या या यशस्वी प्रयोगाचा खेळ आता राजधानी दिल्लीतच पाहायला मिळाला होता. अखेर याची अखेर काँग्रेस प्रवेशाने झाली.
 
उदित राज यांनी सनदी सेवेचा राजीनामा देऊन "भारतीय न्याय पक्षा'ची स्थापना केली होती. मात्र, 2009 मध्ये ते पराभूत झाले. 2014 च्या निवडणुकीपूर्वी त्यांनी आपला पक्ष भाजपच्या दावणीला बांधला व मोदी लाटेत ते दिल्लीतून निवडूनही आले. मात्र, काही काळातच त्यांचा भाजपबद्दल भ्रमनिरास झाल्याचे सांगितले जाते. गेली किमान दोन वर्षे उदित राज सूचक विधाने करून पक्षाच्या नेतृत्वाला शाब्दिक आहेर देत होते. त्याच वेळी त्यांचे तिकीट कापले जाणार, याची कुणकूण त्यांना लागल्याची चर्चा होती. अखेर त्यांना उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांना भाजपला रामराम केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress President Rahul Gandhi welcomes Udit Raj into the Congress