राहुल गांधींचा उत्तराधिकारी ठरणार 10 ऑगस्टला

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 4 ऑगस्ट 2019

काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक 10 ऑगस्टला (शनिवार) होणार आहे. नेतृत्व निवडीसाठी होणाऱ्या या बैठकीत हंगामी अध्यक्षांची निवड होण्याची दाट शक्‍यता आहे. 

नवी दिल्ली : काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक 10 ऑगस्टला (शनिवार) होणार आहे. नेतृत्व निवडीसाठी होणाऱ्या या बैठकीत हंगामी अध्यक्षांची निवड होण्याची दाट शक्‍यता आहे. 

कॉंग्रेसचे संघटना सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी आज ट्‌विट करून 10 ऑगस्टला कार्यकारिणी बैठक होणार असल्याची घोषणा केली. मात्र, बैठकीचा अजेंडा त्यांनी जाहीर केलेला नाही. मागील आठवड्यात मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी संसद अधिवेशन समाप्तीनंतर कार्यकारिणी बैठक होणार असल्याचे सांगितले होते. 

संसद अधिवेशनाची सांगता 7 ऑगस्टला (बुधवारी) होणार आहे. त्यानंतर शनिवारी कार्यकारिणीची बैठक होऊन त्यात राहुल गांधींचा उत्तराधिकारी निवडला जाईल. पक्षातील सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कार्यकारिणीमध्ये राहुल यांचा राजीनामा स्विकारल्यानंतर हंगामी अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू केली जाईल. 

राहुल गांधींनी लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्विकारून दिलेला राजीनामा कार्यकारिणीमध्ये फेटाळण्यात आल्यानंतरही त्यांनी जाहीर पत्राद्वारे राजीनामा मागे घेणार नसल्याचे स्पष्ट केले होते. सोबतच, अन्य नेत्यांनी पराभवाची जबाबदारी स्विकारली नसल्याची खंतही व्यक्त केली होती. 

काँग्रेसमध्ये नवा अध्यक्ष कोण असेल यावरून अटकळबाजी सुरू आहे. ज्येष्ठ की तरुण नेतृत्व याबाबतचे अंदाज लढविले जात असून, मुकूल वासनिक, सुशीलकुमार शिंदे, मल्लिकार्जुन खर्गे यांच्यापासून ते ज्योतिरादित्य शिंदे, सचिन पायलट त्याचप्रमाणे राहुल गांधींच्या भगिनी प्रियांका गांधी वढेरा यांचीही नावे चर्चेत आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress President Will be Decide on 10th August