ना लष्करप्रमुख ना अधिकारी, तरीही...मोदींच्या आर्मी अवताराचा काँग्रेसने घेतला समाचार

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 17 November 2020

काँग्रेसने म्हटलंय की, देशाने खूप सारे पंतप्रधान पाहिले आहेत. परंतु एक बहुरुपी पंतप्रधान पहिल्यांदाच भारताला मिळाला आहे. 

नवी दिल्ली : तोतयागिरी करणारा पंतप्रधान अशी टीका केल्यानंतर आज मंगळवारी काँग्रेसने पंतप्रधान मोदी यांनी दिवाळीदिवशी BSF जवानांना भेटताना घातलेल्या कपड्यांवरुन प्रश्न उपस्थित केला आहे. नरेंद्र मोदींनी आपली दिवाळी राजस्थानमधील जैसलमेरमधील BSF जवानांसोबत घालवली होती. तेंव्हा त्यांनी सैन्याचा गणवेश परिधान केला होता. 

हेही वाचा - आमदार निवडून आणा आणि इनोव्हा कार जिंका; भाजपची नवी स्कीम

यावर टीका करताना आज काँग्रेसच्या युथ विंगच्या ट्विटरवरुन पंतप्रधान मोदी यांचे आर्मीच्या गणवेशातील एक फोटो पोस्ट करण्यात आला आहे. तसेच एखाद्या राजकारण्याने आर्मीचा प्रतिष्ठीत गणवेश घालणे कितपत योग्य आहे, असा सवालही केला आहे. या फोटोवर हिंदीमध्ये लिहलंय की, हे सैन्याचे प्रमुख नाहीयेत की अधिकारी नाहीयेत. मग एखादा सैन्यात नसणारा नेता सैन्याची वर्दी परिधान करणे कितपत योग्य आहे? असा सवालही करण्यात आला आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग सातव्यांदा आपली दिवाळी आर्मीच्या सैन्यासोबत घालवली आहे. यावेळी ते राजस्थानमधील जैसलमेर येथे गेले होते. तेथे सैन्याची वर्दी घालून त्यांनी तेथील सैनिकांना संबोधित केले. या कृत्यावर आता कॉंग्रेसने साहजिकच आपला रोष व्यक्त केला आहे. काल कॉंग्रेस नेते तारिक अन्वर यांनी पंतप्रधानांवर यावरुन टीका केली होती. तोतयागिरी करणारा हा व्यक्ती प्रसंगानुरुप आपले कपडे बदलण्यात पारंगत असल्याची टीका त्यांनी केली होती. 

त्यांनी आपल्या ट्विटरवर म्हटलंय की, देशाने खूप सारे पंतप्रधान पाहिले आहेत. परंतु एक बहुरुपी पंतप्रधान पहिल्यांदाच भारताला मिळाला आहे. पंतप्रधान निमित्त पाहून आपले कपडे बदलण्यात कुशल आहेत. कधी चहावाला, तर कधी 10 लाखांचा सूट तर कधी चौकीदार, कधी प्रधानसेवक, कधी साधू तर कधी फौजी जवान! मोदी जी आपल्याला काही तोड नाही. असं म्हणत त्यांनी मोदींच्या या अवतारावर टीका केली. 
    

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress questions PM Modi's military uniform asks Neither he is Army chief nor officer but still