
शास्त्र नव्हे; मोदी खोटे बोलतात: राहुल गांधी
नवी दिल्ली : भारतात कोरोनामुळे ४७ लाख लोक मृत्यूमुखी पडले, या जागतिक आरोग्य संघटनेच्या दाव्यानंतर काँग्रेसने या मुद्द्यावरून मोदी सरकारला घेरले. शास्त्र खोटे बोलत नाही, मोदी बोलतात’, असा प्रहार राहुल गांधी यांनी केला असून मृतांच्या कुटुंबीयांना भरपाईची मागणीही केली. यावेळी सत्य काय आहे हे देशासमोर यावे, असे वक्तव्य प्रियांका गांधी यांनी केले. भारतात कोरोनामुळे ५.२० लाख जणांचा बळी गेल्याचा सरकारचा दावा असताना जागतिक आरोग्य संघटनेने ४७ लाखांचा आकडा जाहीर केला. या पार्श्वभूमीवर, ‘कोविडमुळे ४७ लाख भारतीय दगावले. सरकारच्या दाव्याप्रमाणे ४.८ लाख नव्हे. शास्त्र खोटे बोलत नाही. मोदी बोलतात, असे खोचक ट्विट राहुल यांनी केले. ज्या कुटुंबीयांनी आपल्या प्रिय व्यक्तींना गमावले, त्यांना चार लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.
सरचिटणीस प्रियांका यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, सरकार आकडेवारीचा खेळ करीत आहे. कोविड जागतिक साथीत कोट्यवधी लोक आपल्या प्रियजनांसाठी ऑक्सिजन, औषधे, खाटा यासाठी टाहो फोडत होते. त्यावेळी सरकारचा संपूर्ण भर आकड्यांच्या खेळावर होता. त्यामुळे सत्य काय आहे ते देशासमोर यायला हवे.
कार्यकारिणी बैठक
काँग्रेसचे चिंतन शिबिर उदयपूर येथे १३ ते १५ मेदरम्यान होत आहे. पक्षमजबुती आणि संघटनाबांधणी या मुद्द्यांवर चिंतन अपेक्षित असलेल्या या शिबिराच्या तयारीसाठी सोमवारी कार्यकारिणीची बैठक होणार आहे. यात शिबिरातील चर्चेचे विषय, ठराव त्याचप्रमाणे पक्षाची रणनीती अशा मुद्द्यांवर चर्चा होईल.
Web Title: Congress Rahul Gandhi On Bjp Pm Narendra Modi Not Science Modi Lies Delhi
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..