Congress : अध्यक्षपदी राहुल हवेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Congress Party Rahul Gandhi

Congress : अध्यक्षपदी राहुल हवेत

नवी दिल्ली : काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी महिनाभराचा कालावधी असताना राहुल गांधी यांना पुन्हा अध्यक्ष बनवावे यासाठी पक्षाच्या प्रदेश शाखांमध्ये अहमहमिका लागली आहे. तमिळनाडू, बिहार, जम्मू-काश्मीर, महाराष्ट्रासह सात राज्यांच्या प्रदेश शाखांनी तसे ठराव संमत केले.

निवडणूक १७ ऑक्टोबरला होणार असून एकापेक्षा जास्त उमेदवार असल्यास १९ तारखेला निकाल जाहीर होईल. यात नऊ हजारहून जास्त प्रतिनिधी (डेलिगेट्स) मतदान करतील. अशात अध्यक्षपदात रस नसल्याचे सांगणाऱ्या राहुल यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान मात्र पत्रकारांशी बोलताना सूचक टिप्पणी केली. ‘उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत ओलांडल्यानंतर हा प्रश्न विचारा,‘ असे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे राहुल यांना पदास नकार दिला नसल्याचे काँग्रेसमधील निष्ठावंत गटाचे म्हणणे आहे.

वरिष्ठ नेत्यांच्या मोठ्या समूहाला मात्र अध्यक्षपदाबाबत राहुल यांच्या उदासीनतेची खात्री अद्याप वाटत नाही. त्यामुळे प्रदेश शाखांना राहुल यांच्या समर्थनार्थ ठराव मंजूर करण्यास वरिष्ठ नेत्यांकडून सांगण्यात आल्याचे समजते. त्यामुळेच अहमहमिका लागली आहे. सर्वप्रथम राजस्थानमध्ये आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या गुजरातमध्ये असे ठराव संमत करण्यात आले. रविवारी छत्तीसगडमध्ये ठराव मंजूर झाला होता.

त्यात सोमवारी चार राज्यांची भर पडली. महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही राहुल यांच्या अध्यक्षपदासाठी जाहीरपणे मागणी केली होती. त्यानुसार प्रदेश काँग्रेसमध्ये तसा ठराव मंजूर करण्यात आला. दरम्यान, गांधी कुटुंबाबाहेरील व्यक्तीकडे अध्यक्षपद जाऊ शकते या चर्चेतून राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे नाव पुढे आले. मात्र, राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदावर राहण्यासाठी व विधानसभा निवडणुकीसाठी गेहलोत इच्छुक असल्याचे देखील सांगितले जाते.

वरिष्ठ नेत्यांकडून गुणगान

या निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवून असलेल्या सूत्रांनी सांगितले, की राहुल यांचे पक्षातील सर्वोच्च स्थान वादातीत असल्याने अध्यक्षपदाचा मुद्दा त्यांच्यासाठी गौण आहे. यदाकदाचित अन्य नावाची निवड करण्याची वेळ आली तरी त्या निवडीत राहुल यांचा निर्णय महत्त्वाचा असेल असे सांगताना या सूत्रांनी दिग्विजयसिंह, पी. चिदंबरम, सरचिटणीस जयराम रमेश यांसारख्या वरिष्ठ नेत्यांच्या राहुल यांच्या नेतृत्वकौशल्याचे गुणगान करणाऱ्या वक्तव्यांकडेही लक्ष वेधले.

यूपीचे सोनियांना सर्वाधिकार

लखनौ ः काँग्रेसच्या उत्तर प्रदेश शाखेने पक्षाध्यक्ष निवडीचे सर्वाधिकार हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना दिले. तसा ठराव मंजूर करण्यात आला. प्रदेशाध्यक्षासह सर्व पदाधिकाऱ्यांच्या निवडीबाबतही हा ठराव लागू आहे. विद्यमान प्रदेशाध्यक्षा अनुराधा मिश्रा यांनी हा ठराव एकमताने मंजूर झाल्याचे सांगितले.

तुम्हाला काय वाटते काँग्रेस संपेल? काँग्रेस सोडणाऱ्या कुणालाही आम्ही रोखणार नाही. आपले विचार भाजपशी जुळतात आणि तेथे भविष्य आहे असे कुणाला वाटत असेल त्याची समजूत काढली जाणार नाही. कुणाला भाजपमध्ये जायचे असल्यास त्याला जण्यासाठी माझी मोटार देईन.

- कमलनाथ, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री

Web Title: Congress Rahul Gandhi Party President Post Nomination Election

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..