उत्तर प्रदेशात काँग्रेस-सप आघाडीवर शिक्कामोर्तब

वृत्तसंस्था
रविवार, 22 जानेवारी 2017

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव आज पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहेत. मुलायमसिंह यादव यांना संरक्षक म्हणून समाजवादी पक्षाकडून घोषित करण्यात आले आहे.

नवी दिल्ली - उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि समाजवादी पक्षातील (सप) आघाडीवर शिक्कामोर्तब झाले असून, काँग्रेसला 105 जागा देण्याची तयारी समाजवादी पक्षाने केली आहे.

समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांच्या आघाडीबाबत आज (रविवार) अधिकृत घोषणा होणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव आज पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहेत. मुलायमसिंह यादव यांना संरक्षक म्हणून समाजवादी पक्षाकडून घोषित करण्यात आले आहे. तर, अखिलेश यादव राष्ट्रीय अध्यक्ष असतील. आगामी विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्ष 198 आणि काँग्रेस 105 जागांवर निवडणूक लढविणार आहे. 

काँग्रेसने यापूर्वी 141 जागांची मागणी केलेली होती आणि अखिलेश यांनी ती मान्यही केली होती, असे समजते; परंतु निवडणूक चिन्ह आणि अधिकृत पक्षाची मान्यता मिळाल्यानंतर तसेच मुलायमसिंह यांच्याबरोबर दिलजमाई झाल्यानंतर अखिलेश तत्काळ बदलले आणि त्यांनी कॉंग्रेसच्या जागा कमी करण्यास सुरवात केली. 141 वरून कॉंग्रेसने प्रथम 130, त्यानंतर 121 आणि सरते शेवटी 110 जागांपर्यंत आपली मागणी कमी केली; परंतु अखिलेश यांनी अखेरचा प्रस्ताव म्हणून आज 105 जागा देण्याचे निश्चित झाले आहे.

Web Title: Congress says it is allying with SP for UP polls, will contest from 105 seats