भारत जोडो यात्रा माझ्या राजकारणाचा शेवटचा मुक्काम; सोनिया गांधींचे मोठे विधान I Sonia Gandhi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sonia Gandhi

अधिवेशनात सोनिया गांधींनी मोदी सरकारवरही जोरदार निशाणा साधला.

Sonia Gandhi : भारत जोडो यात्रा माझ्या राजकारणाचा शेवटचा मुक्काम; सोनिया गांधींचे मोठे विधान

Congress Plenary Session 2023 : छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये काँग्रेसचं 85 वं अधिवेशन सुरू झालं आहे. या अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. काँग्रेसची ही परिषद राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

या अधिवेशनात संबोधित करताना काँग्रेस नेत्या सोनिया गांधी म्हणाल्या, सध्या आपल्या देशात अल्पसंख्याकांना लक्ष्य केलं जात आहे. काँग्रेस केवळ राजकीय पक्ष नाही तर भारतीयांच्या हक्काचं व्यासपीठ आहे. भारतीयांच्या हक्कासाठी लढणारा पक्ष ही काँग्रेसची ओळख आहे.

अधिवेशनात सोनिया गांधींनी मोदी सरकारवरही जोरदार निशाणा साधला. त्या म्हणाल्या, केंद्र सरकार आणि आरएसएसनं सर्व स्वायत्त संस्था ताब्यात घेतल्या आहेत. आपला पंतप्रधान देशासाठी नाही तर आपल्या मित्रांसाठी शक्ती वापरत आहे, असा आरोपही त्यांनी केला. यावेळी सोनियांनी राहुल गांधी यांचंही कौतुक केलं.

सोनिया गांधींनी पक्षाच्या नेत्यांना आज संबोधित केलं. आज छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये आयोजित काँग्रेस महाअधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. या महाअधिवेशनात सहभागी होण्यासाठी प्रियंका गांधी सकाळी 9 वाजता रायपूरमध्ये पोहोचल्या. इथं त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं आणि रोड शोही करण्यात आला. त्याचवेळी आता सोनिया गांधी अधिवेशनात काँग्रेस नेत्यांना संबोधित करत आहेत.

राजकीय कारकिर्द संपल्याचे संकेत देत सोनिया गांधी म्हणाल्या, काँग्रेसची भारत जोडो यात्रा माझ्या राजकीय खेळीचा शेवटचा मुक्काम असू शकतो. 2004 आणि 2009 मध्ये आम्ही विजय मिळवला आणि डॉ. मनमोहन सिंग यांच्या सक्षम नेतृत्वामुळं मला समाधान मिळालं. परंतु, सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे माझी कारकिर्द भारत जोडो यात्रेच्या निमित्तानं समाप्त होत आहे. ही यात्रा खूप यशस्वी ठरली आणि काँग्रेससाठी हा टर्निंग पॉइंट होता." दरम्यान, या घोषणेमुळं सोनिया गांधी राजकारणातून संन्यास तर घेणार नाहीत ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा यशस्वी झाली. राहुल गांधींमुळं खडतर प्रवास शक्य झाला, त्यामुळं काँग्रेसचा जनतेशी असलेला संबंध जिवंत झाला आहे. काँग्रेसनं देशाला वाचवण्यासाठी लढा देण्याचा निर्धार केला आहे. काँग्रेस देशाच्या हितासाठी लढणार आहे. तगडे कार्यकर्ते ही काँग्रेसची ताकद आहे. शिस्तीनं काम करायला हवं. आमचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवायचा आहे. वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेवून त्यागाची गरज आहे, असं आवाहनही सोनियांनी केलं आहे.