काँग्रेसनं बब्बर शेर गमावला; प्रवक्ते राजीव त्यागी यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 12 August 2020

अचानक राजीव त्यागी यांची प्रकृती बिघडली आणि ते बेशुद्ध झाले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

नवी दिल्ली - काँग्रेसचे प्रवक्ते राजीव त्यागी (वय ५३ ) यांचे आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांना उपचारांसाठी गाझियाबाद येथील यशोदा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांगी यांनी संध्याकाळी पाच वाजता एका हिंदी खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमातही सहभाग घेतला होता. त्यानंतर घरी आल्यानंतर अचानक त्यांची प्रकृती बिघडली आणि ते बेशुद्ध झाले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. 

राजीव त्यागी यांच्या निधनानंतर काँग्रेस पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. “राजीव त्यागी पक्के काँग्रेसी आणि खरे देशभक्त होते. या कठिण काळात आमच्या प्रार्थना त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहेत,” अशी श्रद्धांजली काँग्रेसने व्यक्त केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटलं की, काँग्रेसनं बब्बर शेर गमावला, राजीव त्यागींचे काँग्रेस प्रेम आणि त्यांचा संघर्ष नेहमीच लक्षात राहील. 

काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी राजीव त्यागींचा अवेळी झालेला मृत्यू वेदनादायी असून यामुळे भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे. राजीव त्यागींच्या कुटुंबाच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. हा धक्का सहन करण्याची ताकद त्यांना मिळो अशा शब्दात प्रियांका गांधींनी त्यागींच्या कुटुंबियांचे सांत्वन केले आहे. 

भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनीही राजीव त्यागी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

संबित पात्रा यांनी श्रद्धांजली वाहताना म्हटलं की,'विश्वास बसत नाही की काँग्रेसचे प्रवक्ते माझे मित्र राजीव त्यागी यांचे निधन झाले. आज सायंकाळी आम्ही सोबतच एका कार्यक्रमात होतो. जीवन खूपच अनिश्चित आहे. आता शब्द नाहीत.'

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: congress spokeperson rajiv tyagi passes away