काँग्रेसच्या अध्यक्षपदी पुन्हा सोनिया गांधी

सकाळ न्यूज नेटवर्क 
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

राजीनामा मागे घेण्याचा कॉंग्रेस कार्यकारिणीचा वारंवार झालेला आग्रह राहुल गांधींनी आज पुन्हा एकदा धुडकावून लावल्यानंतर अखेर कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदी सोनिया गांधी यांची निवड झाली.

नवी दिल्ली : राजीनामा मागे घेण्याचा कॉंग्रेस कार्यकारिणीचा वारंवार झालेला आग्रह राहुल गांधींनी आज पुन्हा एकदा धुडकावून लावल्यानंतर अखेर कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदी सोनिया गांधी यांची निवड झाली. दिवसभरातील चर्चेत सोनिया, राहुल आणि प्रियांका गांधी यांचीच नावे चर्चेत होती. बाकी नावे मागे पडली. 

कॉंग्रेस कार्यकारिणीच्या दोन बैठकांमध्ये आणि प्रदेशनिहाय सल्लामसलतीनंतर सहमतीने सोनियांकडे सर्वोच्च नेतृत्व सोपविण्याचा निर्णय झाला. लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभव आणि एकापाठोपाठ एक राज्यांमधून सत्तेबाहेर झाल्यानंतर कॉंग्रेस संघटनेला लागलेली गळती पाहता पक्षाची ताकद वाढवून भाजप सरकारपुढे समर्थ पर्याय निर्माण करण्याचे खडतर आव्हान सोनियांपुढे असेल. उंबरठ्यावर आलेल्या महाराष्ट्र, हरियाना, झारखंड विधानसभा निवडणुकीतही त्यांच्या क्षमतेचा कस लागणार आहे. 

कॉंग्रेस मुख्यालयात सकाळी अकराच्या सुमारास सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी, डॉ. मनमोहनसिंग यांच्या उपस्थितीत कार्यकारिणीच्या बैठकीस सुरवात झाली. बैठकीत राहुल यांनी राजीनामा मागे घेण्याचा पक्ष नेत्यांचा आग्रह नाकारला. अधीररंजन चौधरी, के. एच. मुनियप्पा यांनी हात जोडून राहुल गांधींना अध्यक्षपदी कायम राहण्याची विनंती केली, तर सल्लामसलतीअंती तुमचेच नाव अध्यक्षपदासाठी आले तर काय कराल, या पी. चिदंबरम यांच्या सवालावर राहुल गांधींनी बोलण्याचे टाळले.

राहुल यांनी "क्रीजच्या बाहेर येऊन षटकार ठोकला आहे. ते परत क्रीजमध्ये जाणार नाहीत. मात्र, तरीही त्यांना आग्रह आहे की राजीनामा मागे घ्यावा,' असे ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले. मात्र, राहुल गांधींनी सर्वांचे आभार मानताना, अध्यक्षपद नसले तर सक्रिय राहणार नाही असे समजू नये. उलट आपण अधिक सक्रिय राहू, असे स्पष्ट केल्यानंतर अखेर नव्या नावावर पक्ष नेत्यांचे अभिप्राय जाणून घेण्याचे ठरले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress Top Body Picks Sonia Gandhi as Interim Congress President