
Rahul Gandhi: राहुल गांधींची छत्रपती शिवरायांशी तुलना? भाजपने घेतली आक्रमक भूमिका
काँग्रेसने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलरवर राहुल गांधी यांचा एक व्हिडिओ ट्विट करण्यात आला आहे. या व्हिडीओला छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेवरील गाणं लावण्यात आलं आहे. या व्हिडीओतून राहुल गांधींची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी केल्याचा गंभीर आरोप भाजपने केला आहे.
काँग्रेसककडून ट्विट केलेल्या या व्हिडिओवर भाजपने आक्षेप घेत व्हिडिओ तातडीने डिलीट करण्याची मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. व्हिडिओ डिलीट करून काँग्रेसने महाराष्ट्राची माफी मागावी असंही बावनकुळे यांनी म्हंटलं आहे. त्यामुळे आता या व्हिडिओवरुन महाराष्ट्रातील राजकारण पुन्हा तापण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
काँग्रेसने महाराष्ट्र आणि देशाची माफी मागावी, अशी माागणी चंद्रशेखर बावनकुळेंनी केली आहे. राहुल गांधी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करणे हे वेदनादायी आहे. हा व्हिडीओ डिलीट करा आणि माफी मागा. जर व्हिडिओ डिलीट केला नाही तर आंदोलन करण्यात येईल असंही बावनकुळे म्हणाले आहेत.
राहुल गांधींच्या व्हिडीओचा सत्ताधारी चुकीचा अर्थ काढत आहेत - नाना पटोले
राहुल गांधींच्या व्हिडीओचा सत्ताधारी चुकीचा अर्थ काढत आहेत असं प्रत्युत्तर नाना पटोलेंनी भाजपला दिलं आहे. कोश्यारींनी शिवरायांचा अपमान केला तेव्हा भाजप का गप्प होती? भाजपाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार नाही. उलट राहुल गांधी हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार पुढे घेऊन जात आहेत, त्यावर भाजपनं नाहक आरोप करणं बंद करावं. महापुरुषांचा अपमान करणाऱ्या भाजप नेत्यांनी जनतेची माफी मागितलेली नाही, असा खोचक टोला नाना पटोले यांनी लगावला आहे.