काँग्रेसला 120 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळेल : सिद्धरामय्या

वृत्तसंस्था
शनिवार, 12 मे 2018

भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार बी. एस. येडीयुरप्पा यांनी शिकरीपुरा येथे मतदानाचा हक्क बजावला. त्यांनी या निवडणुकीत भाजपला बहुमत मिळेल आणि पुढील सरकार आमचे असेल, असे सांगितले.   

बेळगाव : कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांपैकी 222 जागांसाठी आज (शनिवारी) सकाळपासून मतदानाला सुरवात झाली. सत्ताधारी काँग्रेस आणि भाजप या प्रमुख पक्षांमध्येच याठिकाणी लढत होत आहे. यावेळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या निवडणुकीत काँग्रेसला 120 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. 

सत्ताधारी काँग्रेस, भाजप आणि जनता दल (एस) या पक्षांकडून जिंकण्याचा दावा केला जात आहे. सिद्धरामय्या यांनी सांगितले, की कर्नाटकातील जनतेसाठी पाच वर्षे विकासकामे केली. त्यामुळे आम्हाला विश्वास आहे, या निवडणुकीत काँग्रेस 120 पेक्षा अधिक जागांवर विजय प्राप्त करून सत्ता स्थापन करेल. 

yeddyurappa

भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार बी. एस. येडीयुरप्पा यांनी शिकरीपुरा येथे मतदानाचा हक्क बजावला. त्यांनी या निवडणुकीत भाजपला बहुमत मिळेल आणि पुढील सरकार आमचे असेल, असे सांगितले.   

माजी पंतप्रधान आणि जेडीएसचे नेते देवेगौडा यांनी सांगितले, की आम्ही या निवडणुकीत 'किंगमेकर'ची भूमिका बजावून सत्ता स्थापन करू. 

जनता दलचे (एस) नेते कुमारस्वामी आणि त्यांच्या पत्नीने रामानागरा मतदानाचा हक्क बजावला. यावेळी कुमारस्वामी म्हणाले, आम्हाला विश्वास आहे, या निवडणुकीत जेडीएस बहुमताचा आकडा पार करून सत्ता स्थापन करेल. 

कर्नाटकचे माजी लोकायुक्त न्यायमूर्ती संतोष हेगडे यांनी बंगळुरू येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. ते म्हणाले, मागील काही वर्षांपासून गैरप्रकार वाढले आहेत. साड्यांचे वाटप, दारू, धोती आणि कुकरचे वाटप केले जाते आणि मतदारांना प्रभावित केले जाते. हे लोकशाहीचे योग्य उदारहण नाही. 

बंगळुरुचे पोलिस उपायुक्त रवी चन्नन्नवर यांनी सांगितले, की हा एक संवेदनशील मतदान केंद्र आहे. भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मतदान केंद्राच्या 100 मीटर अंतरावर वादाचे प्रकार घडल्याचे पाहिला मिळाले. याबाबत आम्ही तपास सुरु केला असून, संबंधितांवर पुढील कारवाई केली जाईल.  

दरम्यान, बेळगाव जिल्ह्यातील 18 जागांसाठी 203 उमेदवार रिंगणात असून, सीमाभागातील बेळगाव शहर, तालुका व खानापूर तालुक्‍यातील निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष आहे. मतदानाची वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 6 अशी असून, निवडणूक आयोगाने पहिल्यांदाच एक तास वाढवून दिला आहे. 

Web Title: Congress will get over 120 seats says Siddaramaiah