चोराला गाठले... हनीमून पॅकेज भेटले...! 

वृत्तसंस्था
शनिवार, 7 जुलै 2018

"व्यंकटेशच्या धाडसाचे कौतुक आहेच. परंतु, त्यातून इतर पोलिसांनाही प्रेरणा मिळावी, यासाठी त्याला बक्षीस दिले. त्याचे नवीनच लग्न झाल्यामुळे हनीमून पॅकेज हे त्याच्यासाठी विशेष बक्षीस आहे. बंगळूर दक्षिण विभागाच्या डीसीपींनीही यापूर्वी एका कॉन्स्टेबलने असेच चोरट्याला पकडल्यानंतर त्याला दक्षिण भारत ट्रीप पॅकेज दिले होते'' 

- अब्दुल अहद, पोलिस उपायुक्त, बंगळूर

बेळगाव : कॉन्स्टेबल व्यंकटेश के. ई. हा पोलिस खात्यात तसा नवीनच... पण, काहीतरी वेगळे काम करण्याची उर्मी मोठी... चोरट्याने एकाचा मोबाईल घेतला अन्‌ पळू लागला... हातातील मोबाईल हिसकावून नेल्यामुळे संबंधित चोर... चोर... असा ओरडला. हा आवाज व्यंकटेशने ऐकला अन्‌ तब्बल चार किलोमीटर चोरट्याचा पाठलाग करून त्याला फिल्मी स्टाईलने पकडले. त्याचे धाडस ऐकून पोलिस उपायुक्त (डीसीपी) खुश झाले. त्याला 10 हजाराचे रोख बक्षिस दिलेच. परंतु, व्यंकटेशचे नुकतेच लग्न झाल्याचे समजल्यानंतर त्याला केरळचे तीन दिवसाचे हनीमून पॅकेजही बहाल केले. 

व्यंकटेश (वय 31) हा काही महिन्यांपूर्वीच पोलिस सेवेत रूजू झाला आहे. बंगळुरातील बेळ्ळंदूर पोलिस ठाण्यात तो कार्यरत आहे. गुरूवारी (ता. 5) तो कोरमंगल परिसरात ड्युटी बजावत होता. यावेळी दुचाकीवरून भरधाव आलेल्या अरुण दयाल (20, रा. कोरमंगल झोपडपट्टी) या चोरट्याने रस्त्यावर थांबलेल्या हनुमंत नामक व्यक्तीच्या हातातील मोबाईल हिसकावला व त्याच वेगाने पळाला. मोबाईलधारक ओरडताच दुचाकी घेऊन थांबलेल्या व्यंकटेशच्या चोरीची घटना लक्षात आली. त्याने क्षणाचाही विलंब न लावता व आपला सहकारी दुचाकीवर बसण्यापूर्वीच गाडीला किक मारली अन्‌ चोरट्याचा पाठलाग सुरू केला. सुमारे 4 चार किलोमीटरपर्यंत पाठलाग करून त्याच्या धावत्या दुचाकीला लाथ मारली, रस्त्यावर कोसळलेल्या चोरट्याला रंगेहाथ पकडून ठाण्यात आणले. 

डीसीपी खुश

व्यंकटेशचे हे धाडस ऐकून डीसीपी अब्दुल अहद बेहद्द खुश झाले. त्यांनी तातडीने 10 हजाराचे रोख बक्षिस व्यंकटेशला दिले. व्यंकटेशबद्दलची माहिती घेताना त्यांना समजले, की त्याचे सहा महिन्यापूर्वी लग्न झाले आहे. त्यामुळे त्यांनी चक्क तीन चार दिवस तीन रात्रींचे केरळमधील नामांकित हॉटेलचे हनीमून पॅकेज बहाल केले. सुटी घेऊन हनीमूनला जाऊन येण्याची सूचनाही त्याला केली. 

Web Title: Constable Gets Honeymoon Package Because of his Bravery