इराणकडून तेल खरेदी सुरूच 

इराणकडून तेल खरेदी सुरूच 

नवी दिल्ली (पीटीआय) : अमेरिकेने इराणवर निर्बंध टाकलेले असताना भारताने इराणकडून खनिज तेलाची खरेदी कायम ठेवली आहे. इराणशी भारताच्या दोन सरकारी तेल कंपन्यांनी नोव्हेंबर महिन्यातील खरेदी करार केले आहेत. 

याविषयी पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले, "आमच्या दोन कंपन्यांनी इराणशी नोव्हेंबर महिन्यातील खनिज तेल खरेदीचे करार केले आहेत. आम्हाला अमेरिकेच्या निर्बंधातून सवलत मिळेल की नाही, अद्याप माहिती नाही. आम्ही राष्ट्रहित डोळ्यांसमोर निर्णय घेतला आहे. भारताच्या स्वत:च्या इंधनविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.'' 

इराणवरील अमेरिकेचे निर्बंध 4 नोव्हेंबरपासून लागू होत आहेत. या पार्श्‍वभूमीवर प्रधान यांनी प्रथमच इराणकडून तेल खरेदीची भूमिका उघडपणे मांडली आहे. 

इंडियम ऑइल कॉर्पोरेशनचे अध्यक्ष संजीव सिंह म्हणाले, ""आमच्या कंपनीने इराणशी नोव्हेंबर महिन्यात तेल खरेदी करण्याचा करार केला आहे. नेहमीच्या प्रमाणात आम्ही इराणकडून तेल खरेदी करीत आहोत. इराणला कशाप्रकारे देयके देण्यात येतील, याबाबत चर्चा सुरू आहे. निर्बंध नसतानाही इराण रुपयामध्ये देयके स्वीकारत होता. भविष्यात काय पर्याय शोधता येईल, याचा विचार सुरू आहे.'' 

रुपयात देयके देण्याचा पर्याय 
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आणि मंगळूर रिफायनरी ऍण्ड पेट्रोकेमिकल्स या कंपन्यांनी इराणकडून 12.5 लाख टन खनिज तेल खरेदीचे करार केले आहेत. इराणवरील अमेरिकेच्या निर्बंधांमुळे रुपयात देयके करण्याचा पर्याय भारतासमोर आहे. याचबरोबर भारतातून औषधे आणि इतर वस्तूंची निर्यात इराणला करून देयकांची तडजोड करण्याचा पर्यायावरही विचार सुरू आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com