लष्करप्रमुखांची निवड शंकास्पद: कॉंग्रेस,डाव्यांची टीका

वृत्तसंस्था
रविवार, 18 डिसेंबर 2016

लष्कर हे सर्व भारताचे आहे. अशा प्रकारे एखाद्या अधिकाऱ्याची निवड कशी होते, यासंदर्भात सरकारने स्पष्टीकरण द्यावयास हवे. अशा नेमणुकांना देशाची मान्यता असावयास हवी

नवी दिल्ली - लेफ्टनंट जनरल प्रदीप रावत यांची भारतीय लष्करप्रमुखपदी करण्यात आलेली निवड राजकीय वादग्रस्त ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. रावत यांच्यापेक्षा वरिष्ठ असलेल्या अधिकाऱ्यांना डावलून रावत यांची निवड करण्यात आल्यासंदर्भात कॉंग्रेस व डाव्या पक्षांनी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे.

"नव्या लष्करप्रमुखांच्या क्षमतेबद्दल आम्ही शंका घेत नाही. मात्र त्यांच्यापेक्षा वरिष्ठ असलेल्या तीन अधिकाऱ्यांना डावलून त्यांची करण्यात आलेली निवड शंकास्पद आहे,'' असे कॉंग्रेसचे प्रवक्ते मनीष तिवारी यांनी म्हटले आहे.

याशिवाय, कम्युनिस्ट पक्षाचे नेते डी राजा यांनीही सरकारच्या या निर्णयावर टीका केली आहे. लष्करप्रमुखांसारख्या उच्चपदस्थ व्यक्तींची निवड वादग्रस्त ठरणे "दुदैवी' असल्याची भावना राजा यांनी व्यक्त केली आहे.

""लष्कर हे सर्व भारताचे आहे. अशा प्रकारे एखाद्या अधिकाऱ्याची निवड कशी होते, यासंदर्भात सरकारने स्पष्टीकरण द्यावयास हवे. अशा नेमणुकांना देशाची मान्यता असावयास हवी,'' असे राजा म्हणाले.

Web Title: Controversy Over Army Chief's Appointment