महिलांवर अत्याचार करणारे मोकाट

वृत्तसंस्था
सोमवार, 19 डिसेंबर 2016

दिल्ली "रेप कॅपिटल'
राजधानी दिल्लीतील प्रत्येक जिल्ह्यात एक जलदगती न्यायालय असूनही, दिल्लीत महिलांच्या विरोधात गुन्हे करणाऱ्यांना शिक्षा होण्याचे प्रमाण फक्त 35 टक्के आहे. देशाला हादरविणाऱ्या "निर्भया' प्रकरणानंतर महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी अनेक ठोस पावले उचलण्यात आली. अशा गुन्ह्यांतील आरोपींना शक्‍य तितक्‍या लवकर शिक्षा करण्याच्या उद्देशाने दिल्लीत जलदगती न्यायालये स्थापन केली असली, तरी त्यामुळे फारसा काही फरक पडलेला नाही, असे आकडेवारीवरून दिसून येते आहे.

नवी दिल्ली - महिलांच्या विरोधात गुन्ह्यांचे आरोप असलेल्यांना शिक्षा होण्याचे प्रमाण मागील वर्षी अवघे 21.7 टक्के असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. विशेष म्हणजे महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना शिक्षा होण्याचे दिल्लीतील प्रमाण 2015मध्ये 35 टक्के असल्याचे भयाणक वास्तव राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागातर्फे (एनसीआरबी) प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे. एकूणच दिल्लीने "रेप कॅपिटल' ही आपली ओळख कायम ठेवल्याचे दिसून येते.

राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागातर्फे 2015मधील आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. मागील वर्षी महिलांच्या विरोधात गुन्हे करणाऱ्या एकाही गुन्हेगाराला अरुणाचल प्रदेशात शिक्षा झालेली नाही; तर दुसरीकडे अशा स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये सर्वांधिक शिक्षा झाल्याचे प्रमाण मिझोरामध्ये आहे. अरुणाचल प्रदेशात मागील वर्षी महिलांविरोधी गुन्ह्यांची 384 प्रकरणे समोर आली असून, एकूण 408 जणांना अटक करण्यात आली होती. त्यापैकी 303 जणांच्या नावांचा आरोपपत्रात समावेश करण्यात आला होता आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्यापैकी एकालाही शिक्षा ठोठावण्यात आली नाही.

मिझोराम आघाडीवर
महिलांच्या विरोधात गुन्हे करणाऱ्यांना शिक्षा होण्याचे प्रमाण मिझोराममध्ये (77.4 टक्के) सर्वांधिक आहे; तसेच लहान मुलांच्या विरोधात गुन्हे करणाऱ्या आरोपींना शिक्षा ठोठाविण्यातही मिझोराम (63.3 टक्के) राज्य देशात आघाडीवर आहे हे विशेष. आरोपींना शिक्षा ठोठाविण्यात नागालॅंड राज्याच्या दुसरा क्रमांक लागतो. महिलांच्या विरोधातील गुन्ह्यांतील आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण 76.7 टक्के ऐवढे आहे; तर लहान मुलांच्या विरोधातील गुन्ह्यांमधील आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण नागालॅंडमध्ये 63.6 टक्के आहे.

लहान मुलांच्या विरोधातील गुन्ह्यांच्या प्रकरणामधील आरोपींना शिक्षा होण्याचे दिल्लीतील प्रमाण 38 टक्के आहे. राजधानीत मागील वर्षी लहान मुलांच्या विरोधातील गुन्ह्यांची एकूण 9 हजार 489 प्रकरणे नोंदविण्यात आल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Conviction rate of people accused of crimes against women in the country