बारावीच्या 959 विद्यार्थ्यांची कॉपी; उत्तरे अन् चुकाही समान 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 16 जुलै 2019

- एकाच परिक्षाकेंद्रावरील अजब प्रकार
- गुजरातमध्ये सामूहिक कॉपी उघडकीस 
- शिक्षकांनीच सांगितली उत्तरे 

अहमदाबाद ः गुजरातमध्ये बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत 959 विद्यार्थ्यांनी सामूहिक कॉपी केल्याचे उघडकीस आले आहे. या सर्व विद्यार्थ्यांनी एका प्रश्‍नाचे उत्तर एकसारखेच लिहिले असल्याचे पाहून गुजरात माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे (जीएसएचएसईबी) अधिकारी कोड्यात पडले आहेत. 

संबंधित विद्यार्थ्यांनी ज्या विषयाच्या परीक्षेत कॉपी केली त्यात त्यांना अनुत्तीर्ण करून त्यांचे निकाल 2020 पर्यंत राखीव ठेवण्यात येणार आहे. गुजरातमध्ये परीक्षेत कॉपी होऊ नये म्हणून कडक पावले उचलली असूनही ही घटना समोर आल्याने मंडळाच्या कारभारावर प्रश्‍न उपस्थित होत आहेत. जुनागड आणि गिर-सोमनाथ जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवर कॉपीच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडल्याच्या तक्रारी आल्यानंतर मंडळाच्या अधिकाऱ्यांनी अशा विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासल्या. त्या वेळी 959 विद्यार्थ्यांनी एका प्रश्‍नाचे उत्तर एकसमान असल्याचे आढळून आले.

"मुलगी वंशाचा दिवा' (दिकरी घर नी दिवडी) हा निबंध 200 विद्यार्थ्यांनी सुरवातीपासून शेवटपर्यंत एकसमान लिहिला आहे. कॉपीच्या दाव्याची शहानिशा करण्यासाठी परीक्षा सुधारणा समितीच्यापुढे विद्यार्थी हजर झाल्यानंतर त्यांचा निकाल राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. परीक्षा केंद्रात शिक्षकांनीच उत्तरे सांगितल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली. 

शिक्षकांनीच सांगितली उत्तरे 
अकाउंटिंग, इकॉनॉमिक्‍स, इंग्रजी आणि स्टॅटस्टिक या विषयांमध्ये सामूहिक कॉपी जास्त झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. यातील प्रश्‍नांची उत्तरे 959 विद्यार्थ्यांनी सारखीच लिहिली आहेत. त्यांचा क्रमही एकच असून त्यातील चुकाही समान आहेत. या कॉपी प्रकरणामुळे बारावीच्या काही परीक्षा केंद्रांची मान्यता रद्द करण्याची तयारी "जीएसएचएसईबी' करीत आहे. परीक्षा केंद्रातील शिक्षकांनीच उत्तरे सांगितल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Copy case in Board exam in Gujrat