देशातून आली कोरोनाची गुड न्यूज : ऍक्टिव पेशंट्सचा आकडा 9 लाखांच्या खाली

सकाळ ऑनलाईन टीम
Friday, 9 October 2020

भारतात कोरोनातून बरे होत असलेल्या रुग्णाची संख्या वाढताना दिसत आहे. गेल्या तीन आठवड्यात कोरोनाच्या आढळलेल्या रुग्णांपेक्षा कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे.

नवी दिल्ली: भारतात कोरोनातून बरे होत असलेल्या रुग्णाची संख्या वाढताना दिसत आहे. गेल्या तीन आठवड्यात कोरोनाच्या आढळलेल्या रुग्णांपेक्षा कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे.

मागील 24 तासात देशात कोरोनातून रिकव्हर झालेल्या रुग्णांपैकी जवळपास 75 टक्के रुग्ण 10 राज्यातील आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल, दिल्ली आणि मध्य प्रदेश या राज्यांचा समावेश आहे. यातही महाराष्ट्रातच सर्वाधिक कोरोना रुग्ण बरे झाल्याचे दिसले आहे. 

देशातील कोरोना रुग्णांचा आकडा सातत्याने उतरताना दिसत आहे. सध्या देशातील कोरोनावर उपचार घेत असलेल्या रुग्णांचा आकडा 9 लाखाच्या खाली गेला असून तो 8.93 लाखांपर्यंत खाली गेला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

मागील तीन आठवड्यांतील देशातील कोरोनाच्या आकडेवारीचा ट्रेंड बदलताना दिसला आहे. 18 ते 24 सप्टेंबर दरम्यान देशात कोरोनाच्या 6 लाख 14 हजार 265 कोरोना रुग्णांचं निदान होऊन 6 लाख 49 हजार 908 कोरोनातून बरे झाले होते. या आठवड्यात नवीन रुग्णांपेक्षा जवळपास 33 हजार जास्त कोरोना रुग्ण बरे झाले होते. त्यानंतरच्या आठवड्यात 25 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर मध्ये 5 लाख 80 हजार 66 जणांना कोरोनाची बाधा झाली होती तर 5 लाख 98 हजार 214 जण कोरोनामुक्त झाले होते.

गेल्या आठवड्यात म्हणजे 2 ते 8 ऑक्टोबर दरम्यान देशात 5 लाख 23 हजार 71 कोरोनाचे नवीन रुग्ण आढळले होते तर 5 लाख 54 हजार 503 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली होती. जर मागील 3 आठवड्यांचा विचार केला तर नवीन रुग्ण आढळण्याचे प्रमाणही कमी झाल्याचे दिसले आहे. 

देशात कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 1 लाखांच्या वर गेली आहे. मागील 24 तासांत देशात कोरोनाच्या 964 रुग्णांचा मृत्यू झाला होता. या 964 रुग्णांपैकी 82 टक्के कोरोना रुग्ण 10 राज्यातील आहेत. विषेश म्हणजे त्यामध्ये महाराष्ट्र 354 रुग्णांसह प्रथम क्रमांकावर आहे. महाराष्ट्रानंतर अनुक्रमे कर्नाटक (101), तामिळनाडू(68), पश्चिम बंगाल(63), उत्तर प्रदेश(45), आंध्रप्रदेश(42), दिल्ली(37), मध्य प्रदेश(29), पंजाब(29) आणि केरळ(24) या राज्यांचा समावेश होतो. 

(edited by- pramod sarawale)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona recovery rate is at the top maharashtra