घरामध्येच करता येणार कोरोना चाचणी; ‘आयआयटी’, ‘एनसीएल’कडून तयार होतेय किट

सोमवार, 29 जून 2020

दिल्ली आयआयटी व पुण्यातील एनसीएल यावर संशोधन करीत आहेत.ही चाचणी अचूक असणार आहे.विज्ञान व उद्योग संशोधन परिषदेअंतर्गत हे संशोधन होत असून,त्यासाठी मायक्रोसॉफ्ट इंडियाने आर्थिक मदत उपलब्ध करून दिली आहे

नवी दिल्ली - घरामध्येच बसून कोरोनाची चाचणी लवकरच करता येणार आहे. दिल्ली आयआयटी आणि पुण्यातील राष्ट्रीय केमिकल लॅबोरेटरी (एनसीएल) यावर संशोधन करीत आहेत. ही चाचणी अचूक असणार आहे. विज्ञान व उद्योग संशोधन परिषदेअंतर्गत (कौन्सिल फॉर सायंटिफिक अँड इंडस्ट्रिअल रिसर्च-सीएसआयआर) हे संशोधन होत असून, त्यासाठी मायक्रोसॉफ्ट इंडियाने आर्थिक मदत उपलब्ध करून दिली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

यासंदर्भात काम करणाऱ्या टीमने दिलेल्या माहितीनुसार, या संशोधनात ‘एलायझा’ (एंझाइम लिंक्‍ड इम्युनोसे सिरेओलॉजिकल ॲसे) नावाचे किट विकसित करण्यात येईल. ते यशस्वी झाल्यास संसर्ग रोखण्यासाठी प्रभावी ठरेल. येत्या महिनाभरात ही चाचणी प्रत्यक्षात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अंदाजे पाचशे रुपयांमध्ये हे किट उपलब्ध होईल. ते तयार करण्यासाठी आंध्र प्रदेशातील प्रयोगशाळेत काम सुरू आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोना विषाणूशी लढा देताना त्याची चाचणी करणे हेसुद्धा एक आव्हान आहे. सध्या ‘रिअल टाइम-पॉलिमरेझ चेन रिॲक्‍शन’ (आरटी-पीसीआर) या चाचणीद्वारे कोरोनाचे निदान केले जाते. ही चाचणी केवळ प्रयोगशाळेत शक्‍य आहे. त्यालाही अनेक तास लागतात. त्यामुळे घरामध्येच सहजपणे करता येणारी चाचणी आम्ही विकसित करीत आहोत.
- अनुराग राठोड, प्राध्यापक, रसायन अभियांत्रिकी, आयआयटी, दिल्ली