लसीकरण उद्दिष्टपूर्ती बाबत केंद्राची भूमिका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona vaccination

लसीकरण उद्दिष्टपूर्ती बाबत केंद्राची भूमिका

नवी दिल्ली : सन २०२२ च्या अखेरर्यंत देशातील सर्व नागरिकांचे कोरोना लसीकरण पूर्ण होणारच,असा विडा केंद्र सरकारने उचलला होता. आता ते उद्दिष्ट पूर्ण साध्य न झाल्याची ओरड सुरू होताच केंद्राने, ‘लसीकरण पूर्णतः एच्छिक आहे. त्यामुळे त्यासाठी लोकांवर सक्ती न करता जनजागृती व संवादाच्या मार्गाने लसीकरणाची टक्केवारी वाढविण्यात सरकार यशस्वी ठरले आहे,‘ अशी भूमिका घेतली आहे.

नरेंद्र मोदी सरकारने जगातील सर्वांत विशाल राष्ट्रीय लसीकरण मोहीमेची घोषणा मागील वर्षीच्या मध्यात केली. त्या वेळी, डिसेंबर २०२१ पर्यंत १३० कोटी भारतीयांचे लसीकरण पूर्ण होईल असा निर्धार तत्कालीन आरोग्यमंत्री हर्षवर्धन, माहिती-प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर, कायदा मंत्री रविशंकर प्रसाद आदींनी व्यक्त केला होता. मागच्या वर्षीच्या मंत्रिमंडळ विस्तारात सत्तारूढ नेतृत्वाने तिघांच्याही बाबत ‘दे धक्का‘ धोरण अंमलात आणले. पंतप्रधान मोदी यांचे दिर्घकालीन विश्वासू मनसुख मंडावीया यांची नियुक्ती नवे केंद्रीय आरोग्यमंत्री म्हणून करण्यात आली.

त्यानंतरच्या काळात देशातील १९४ कोटी नागरिकांचे नागरिकांचे लसीकरण झाले आहे अशी माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांनी ‘सकाळ' ला दिली. यात पहिला डोस घेतलेले ९९ कोटी, दोन्ही डोस घेतलेले ८३ कोटी व बूस्टर डोस घेतलेले २ कोटी नागरिक आहेत. पूर्ण लसीकरण करणारांचे प्रमाण सातत्याने वाढत असून केंद्राच्या जनजागृती मोहीमेचा व पंतप्रधानांनी स्वतः वारंवार केलेल्या आवाहनचा सकारात्मक परिणाम लसीकरण मोहीमेवर झाल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान आयुष्मान भारत मोहीमेत देशात ५० कोटी लाभार्थी निश्चित करण्यात आले असून त्यातील १७ कोटी लाभार्थींना कार्डवाटप झाले आहे. या योजनेचे फायदे लक्षात येतील तसतसे कार्डधारकांचे प्रमाण वाढत जाईल असे सांगून डॉ. पवार म्हणाल्या की आयुष्मान भारत योजनेच्या लाभार्थ्यांच्या याद्या दुर्गम भागापर्यंत आहेत. या योजनेत आतापावेतो ३ कोटी ३० लाख नागरिकांवर मोफत उपचार करण्यात आले आहेत. कार्ड नसले तरी यादीत नाव आहे की नाही ते पाहून उपचार सुरू करावेत अशा ‘स्टॅंडिंग इन्स्ट्रक्शन्स' सर्व शासकीय रूग्णालयांच्या प्रमुखांना देण्यात आल्या आहेत. या योजनेचीही जनजागृती देशभरात झाली आहे.

कोरोनाचा ‘एक्स ई‘ हा नवा व्हेरियंट अलीकडेच मुंबईत आढळला त्याबाबत घबराट उडवू नये असे आवाहन डॉच पवार यांनी केले. त्या म्हणाल्या की मुंबईत याचा रूग्ण नुकताच आढळला. त्याचे नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. तपासणीनंतर येत्या २-४ दिवसांत त्याचा अहवाल येईल. त्यानंतर केंद्र नवीन व्हेरियंटबाबत राज्यांना दिशानिर्देश जारी करेल असेही त्या म्हणाल्या.

Web Title: Corona Vaccination All Citizens Of Country Complete End Of 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top