कोरोना आणि पत्रकार 

corona
corona

कोरोनाग्रस्त देशात रूग्णांना औषधोपचार करणाऱ्या हजारो नर्सेस, डॉक्टर्स व रुग्णालयात काम करणाऱ्यांना मृत्यूचा सामना करावा लागला. त्यांचे असंख्य मृत्यू झाले. आजही होत आहेत. चीनमध्ये ज्याने कोरोनाच्या विषाणूच्या प्रसाराबाबत गौप्यस्फोट केला, तो डॉ ली वेनलियांग त्याच रोगाने फेब्रवारी 2020 मध्ये मरण पावला.  कोरोनाच्या बातम्या देणाऱ्या पत्रकारांच्या जिवावरही तसेच बेतले आहे. बिझिनेस टुडे च्या 29 डिसेंबर 2020 बातमीनुसार, कोरोनाचे वार्तांकन करताना बाधा झालेले जगातील तब्बल 500 पत्रकार मरण पावले. त्यात भारतातील 50 पत्रकारांचा समावेश आहे. जीव धोक्यात घालून त्यांनी कर्तव्य पार पाडले. त्याचे परिणाम त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना भोगावे लागले. कोरोनाचे निर्मूलन झालेले नाही, त्यामुळे, त्याचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांचा जीव कायमचा धोक्यात आहे. तथापि, प्रेस एम्ब्लेम कँपेन या संस्थेने 26 डिसेंबरपर्यंत जमा केलेली माहिती थोडी वेगळी आहे. संस्थेनुसार, 57 देशात 585 पत्रकारांचा मृत्यू करोनामुळे झाला. त्यात पेरूचा पहिला क्रमांक असून तेथे 93, तर भारतात 53 पत्रकारांचा मृत्यू झाला. ब्राझिल 51, मेक्सिको 42, इक्वेडोर 41, बांग्लादेश 41, इटली 35, अमेरिका 30, पाकिस्तान 22, तुर्कस्तान 17 व ब्रिटन 12 अशी संख्या आहे. 

जातीय दंगे, युद्ध, नैसर्गिक आपत्ती यांचे वार्तांकन करतानाही पत्रकारांचे मृत्यू झालेले आहेत. व्यवसायामधील एक धोका वा जोखीम समजून पत्रकाराला पुढे जायचे असते. संरक्षण मंत्रालयाचे वार्तांकन करताना मालवाहू एन-32 वा अन्य विमानात प्रवास करण्याआधी पत्रकारांना एका कागदावर सही करावी लागते. त्यात, विमानाला अपघात होऊन आपला मत्यू झाला, तरी त्याला हवाई दल जबबादार असणार नाही, असे लिहून द्यावे लागते. तसेच, युद्धाचे वार्तांकन करतानाही करावे लागते. 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धाचे वार्तांकन करण्यासाठी मी पश्चिम सीमेवर डेरा बाबा नानक येथे गेलो होतो. युद्ध चालू असताना आपल्या सेनेने पाकिस्तानवर केलेल्या एका हल्ल्यात एक जपानी जीप जप्त केली होती. त्याच जीपमधून आम्ही पाकिस्तानातील नानकाना साहब येथे गेलो होतो. त्यावेळीही मरण आल्यास भारतीय लष्कर जबाबदार राहाणार नाही, असे लिहून द्यावे लागले होते. 

कोरोना हे ही एक युद्धच आहे. 2019 च्या डिसेंबरात सुरू झालेले युद्ध केव्हा संपणार हे आज जगालाही माहित नाही. भारतात मरण पावलेलेल्या पत्रकारात आज तक चा नीलांशु शुक्ला, हिमालय दर्पणचा मणिकुमार राय (सिलिगुरी) मल्याळ मनोरमाचा डी विजय मोहन, मंगलेश डबराल, राजीव कटारा (दिल्ली) पंकज शुक्ला (नोयडा) राकेश तनेजा, प्रबीर कुमार प्रधान, (भुवनेश्वर) जितेंद्र डेब्बारमा (त्रिपुरा) पवन हेत्तूर (म्हैसूर), कृष्ण मोहन शर्मा (पाटणा), धनेश्वर रभा (आसाम), अश्वानी कपूर (लुधियाना), गोलप सैक्या (गुवाहाटी), मनोज बानीवाल (इंदूर) आदींचा समावेश आहे. बहुतेकांना वार्तांकन करताना बाधा झाली. प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाने भारत सरकारकडे शिफारस केली आहे, की कोरोनाचे वार्तांकन करताना मरण पावलेल्या पत्रकारांना कोरोना वाऑरिर्स म्हटले पाहिजे व त्यांच्यासाठी सामुहिक विम्याची योजना आखली पाहिजे. 

पत्रकार लौरा ऑलिव्हरने 16 मार्च 2021 रोजी दिलेल्या वृत्तानुसार, भारताव्यतिरिक्त् ब्राझिल, नायजेरिया, व्हिएतनाम आदी देशातील पत्रकार दगावले. याकडे पाहिले, की पत्रकार व्यवयासायावर कोरोनाची टांगती तलवार होती व आजही आहे, असे दिसते. त्याचे केवळ शारिरीक परिणाम झाले नाही, तर विपरित मानसिक परिणामही झाले. थॉम्पसन रॉयटर्स फौंडेशनचे लेखक डॅमियन रँडक्लिफ यांनी 26 देशातील 55 पत्रकारांशी संपर्क साधला असता, त्यांना असे आढळून आले, की वार्तांकनावर येणाऱ्या निर्बंधांव्यतिरिक्त, कधी चुकीच्या माहितीमुळे, अंकीय आकडेवारीवरील अवलंबनामुळे, नाकारात्मक अर्थशास्त्रामुळे मानसिक आरोग्यावर परिणाम झाला. 

कोरोना सुरू झाल्यापासून पत्रकारांवर मोठी गदा आली, ती नोकऱ्यातून बडतर्फ होण्याची, अथवा निम्मे पगार घेण्याची. कोरोनामुळे सुमारे भारतात तीस हजारांपेक्षा अधिक पत्रकारांच्या नोकऱ्या गेल्या, असा अंदाज आहे. तर, अमेरिकेत कोरोनाच्या पहिल्या सहा महिन्यात 11,027 पत्रकारांच्या नोकऱ्या गेल्या. न्यू यॉर्क टाईम्स नुसार, अमेरिकेत नोकऱ्या गमावणे, वेतन कपात, रजेवर जाण्यास सांगण्यात येणे, असे प्रकार झालेल्या पत्रकारांची संख्या तब्बल 37 हजार आहे. अर्थांतच, त्याचा परिणाम वैयक्तिक व कौटुंबिक सुरक्षेवर झाला. साव पावलो (ब्राझिल) मधील मुक्त पत्रकार डिओगो रॉडरिग्ज म्हणतो, की गेल्या वर्षी अस्थिरतेने असे गाठले, की आयुष्य जगणार कसे, याची भीती वाटायला लागली. परंतु, गेल्या अऩेक वर्षात केलेल्या बचतीने निभाऊन नेले. काही जण व्यवसाय बदलून शालेय व अऩ्य पुस्तकनिर्मितीकडे वळले. नायजेरियातीला लागोस मधील केइंडे ओगुनयाले हा पत्रकार म्हणतो, की मुक्त पत्रकार होतो, म्हणून काही पर्यांयांचा विचार तरी करता आला. पण, वृत्तपत्रात नोकरीस असतो, तर नोकरी गमावण्याची वेळ आली असती. भारतीय पत्रकार जयश्री कुमार म्हणते, की सध्या वृत्तपत्रात नोकऱ्या नाहीत. नोकरी मिळाली, तर तुम्हाला दुप्पट काम करायला लावण्यात येते व पगार मात्र निम्मा मिळतो, अशी स्थिती आहे. व्हिएतनाममधील मुक्त पत्रकार सेन गुयेन ही भ्रमंती पत्रकार. वृत्त मिळविण्यासाठी निरनिराळ्या ठिकाणी भेट देणारी. परंतु, कोरोनाने फिरणेच बंद झाले. त्यामुळे विशेष बातम्या मिळेनासे झाले. त्याचा अर्थातच मिळकतीवर बराच परिणाम झाला.  अमेरिकेत एका वृत्तपत्राला वार्तांकन करण्यासाठी पत्रकाराला अतिदूर पाठवायचे होते, परंतु, तेथे मुखपट्टी घालण्याचे कोणतेही संकेत पाळले जात ऩसल्याने पाठवणे धोक्याचे ठरेल, असा निर्णय शेवटी घेण्यात आला. परिणामतः त्या घटनेचे वृत्त मिळविता आले नाही. इंटरनॅशनल प्रेस इन्स्टिट्यूटनुसार, कोरोनाच्या काळात वृत्तपत्र स्वातंत्र्याचे उल्लंघन झाल्याच्या 473 घटना जगात घडल्या. 

गेल्या दोन वर्षात वृत्तपत्र जगतात आणखी एक विचार जोर धरतोय, तो हा की नैसर्गिक आपत्ती, युद्ध आदींचे वार्तांकन करण्यासाठी पत्रकारांना पाठविण्याऐवजी ड्रोनस् पाठवून तेथील परिस्थितीचे व्हिडियो काढून त्यावर आधारित वृत्त तयार करावयाचे, अथवा वाहिन्यांवर ते थेट तसेच दाखवायचे. म्हणजे आंखो देखा हाल लोकांना दिसेल. असे प्रयोग चीन व अमेरिकेत होत आहेत. दक्षिण गोलार्धातील पत्रकारांसाठी रोगराई नवीन नाही. त्यांनी या आधी ब्राझिलमधील झिका, पश्चिम आफ्रिकेतील इबोला, मध्य पूर्व आशिया, आफ्रिका, चीन व दक्षिण आशियातील सार्स व मर्स या साथींच्या काळातही वार्तांकन केले आहे. परंतु, त्या काही विशिष्ट काळ टिकल्या. कोरोनाशी लढण्यासाठी जगात अर्धा डझन लशी असल्या, तरी दोनशेपक्षा अधिक देशात झालेली बाधा, व नंतर आलेले कोरोनाचेच निरनिराळे विषाणू (म्यूटेशन्स वा स्ट्रेन्स) याकडे पाहता फ्रन्टलाईन वर्कर्स व पत्रकारांबरोबर मानवजातीला युद्धासाठी प्रदीर्घकाळ तयार राहावे लागणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com