‘कोरोना’ विषाणूच्या उपद्रवाचे भारतीय उद्योग क्षेत्रावरही सावट

Corona-Danger
Corona-Danger

नवी दिल्ली - चीनमधील ‘कोरोना’ विषाणूच्या उपद्रवाचे भारतीय उद्योग क्षेत्रावरही सावट पडले असून, यावरील संभाव्य उपाययोजनांबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज उद्योग क्षेत्राच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. औषधी घटकांची चीनमधून होणारी आयात थांबली असल्याने दरवाढीची भीती उद्योजकांनी व्यक्त केली. 

चीनमध्ये ‘कोरोना’मुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १८७३ झाली असून, तब्बल ७३,३२५ जणांना संसर्ग झाला आहे. याची झळ चीनसोबतच सिंगापूर, जपान, हाँगकाँगलादेखील बसली आहे. आधीच देशांतर्गत मागणी घटल्यामुळे उद्योजक त्रस्त झाले असताना त्यात ‘कोरोना’ची भर पडण्याने चिंता वाढली आहे. सीतारामन यांनी बोलावलेल्या बैठकीत औषधनिर्माण, वस्त्रोद्योग, इलेक्‍ट्रॉनिक्‍स उपकरणे, रसायन; तसेच हार्डवेअर उद्योगांशी संबंधित प्रतिनिधी तसेच फिकी, असोचेम या संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होते. 

आयात, निर्यातीवर झालेला परिणाम, कच्च्या मालाची; तसेच उपकरणांच्या सुट्या भागांची निर्माण झालेली टंचाई हा बैठकीतील प्रमुख मुद्दा होता. देशातील औषध निर्माण क्षेत्रात लागणाऱ्या तब्बल ७० टक्के कच्च्या मालाची आयात चीनमधून होते. ‘कोरोना’मुळे भविष्यात कच्च्या मालाची टंचाई होण्याची आणि परिणामी दरवाढीची भीती असल्याचे म्हणणे या बैठकीत मांडण्यात आले अाणि अमेरिकेहून आयात करण्याची तयारी ठेवावी अशी सूचना केली.

उद्योजकांनी मांडलेल्या अडचणी सोडविण्यसाठी सरकारकडून सर्वतोपरी मदत केली जाईल; तसेच यासंदर्भात उद्या (ता. १९) पंतप्रधान कार्यालयाशी देखील चर्चा केली जाईल, असे सीतारामन यांनी उद्योजक प्रतिनिधींना सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com