एक वर्षापूर्वी सापडला होता कोरोनाचा पहिला रुग्ण; लॉकडाऊन ते व्हॅक्सिन काय घडलं?

covid 19 test
covid 19 test

नवी दिल्ली - कोरोनामुळे जगाला मोठा फटका बसला आहे. अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेची अवस्था बिकट झाली आहे. आतापर्यंत जगभरात कोरोनाने 13 लाखांहून अधिक जणांचा बळी घेतला आहे तर 5 कोटी 54 लाखांहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. केवळ जिवितच नाही तर वित्त हानीही प्रचंड झाली आहे. चीनमध्ये पहिला रुग्ण सापडल्यानंतर गेल्या वर्षभरापासून कोरोना जगात थैमान घालत आहे. या वर्षभरात अनेक गोष्टी बदलल्या. सामाजिक ते आर्थिक अशा अनेक पातळ्यांवर बदल झाले. न्यू नॉर्मल लाइफ जगत असताना कोरोनाचा संसर्ग होणार नाही याची काळजी घेतली जात आहे. मात्र तरीही कोरोनाचा धोका टळलेला नाही.

जगात कोरोनाचा पहिला रुग्ण एक वर्षापूर्वी 17 नोव्हेंबरला सापडल्याचा दावा साउथ चायना मॉर्निंग पोस्टने केला होता. चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार 17 नोव्हेंबर 2019 ला पहिला कोरोनाचा रुग्ण सापडला होता. त्याचं वय 55 इतकं होतं. तो व्यक्ती कोरोनामुक्त झाला की नाही याची माहिती उपलब्ध नाही. कोलंबिया विद्यापीठातील मायक्रोबायोलॉजीचे प्राध्यापक विन्सेन्ट रॅनिएलो यांनी दिलेल्या माहितीनुसार, वुहानमधील मासळी बाजारात जाणाऱ्या लोकांना आधीपासूनच कोरोनाची लागण झाली होती. अशा परिस्थितीत वेट बाजारातील लोकांना जबाबदार धरणं योग्य नाही असं म्हटलं होतं. 17 नोव्हेंबरनंतर दररोज 5 नवीन रुग्ण आढळले होते. तर 15 नोव्हेंबरपर्यंत ही संख्या 27 तर 20 डिसेंबरपर्यंत हाच आकडा 60 च्या पुढे पोहोचला होता. 

कोरोना संसर्गाचा वेग रोखण्यासाठी लॉकडाऊन
कोरोनाचं संकट ओढावल्यानंतर जगातील जवळपास सर्वच देशांनी लॉकडाऊन केलं. सुरुवातीला अमेरिका आणि युरोपात कोरोनाने हाहाकार माजवला. यामध्ये लाखो नागरिकांचे बळी गेले. कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊनही करण्यात आलं. अनेक देशांमध्ये हा लॉकडाऊन जवळपास सहा महिन्यांपर्यंत होता. तर युरोपातील काही देशांनी आता पुन्हा लॉकडाऊन केलं आहे. भारतात देखील कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. लॉकडाऊन केल्यानं सर्वकाही ठप्प झाले. यामुळे अर्थव्यवस्थेलासुद्धा मोठा फटका बसला आहे. भारतातही मार्चपासून जुन महिन्यापर्यंत लॉकडाऊन करण्यात आलं होतं. त्यानंतर अजुनही टप्प्या टप्प्याने लॉकडाऊनचे नियम शिथिल केले जात आहेत.

व्हॅक्सिनला मिळतंय यश
जगभरात कोरोना पसरवल्याचा आरोप चीनवर अनेक देशांनी केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तर उघडपणे चीनवर आरोप केले. मात्र चिनने हे सर्व आरोप फेटाळून लावले. तसंच चीनने कोरोनाची माहिती लपवल्याचंही अनेकदा म्हटलं गेलं आहे. आता कोरोनाला रोखण्यासाठी जगभरात व्हॅक्सिनचं संशोधन सुरू आहे. फायझर आणि मॉडर्नाच्या लशी 90 टक्क्यांहून अधिक प्रभावी ठरल असल्यानं लवकरच लस मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. याशिवाय इतरही देशांमध्ये कोरोनाच्या लशीचं संशोधन सुरू आहे. चीनमध्येही 8 व्हॅक्सिनवर काम सुरू आहे. पुढच्या वर्षीपर्यंत चीन कोरोनाचं व्हॅक्सिन बाजारात आणण्याची शक्यता आहे. भारतातही कोरोनाच्या 3 व्हॅक्सिनवर काम सुरू असून यातील एका लशीची ह्युमन ट्रायल सुरू आहे. कोरोनाला रोखण्यासाठी व्हॅक्सिनचे संशोधन सुरू असले तरी जागतिक आरोग्य संघटनेनं नुकतंच असं म्हटलं आहे की, फक्त व्हॅक्सिनमुळे कोरोना नष्ट होणार नाही.

सध्या मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग हाच उपाय
व्हॅक्सिन सर्वसामान्यांपर्यंत येण्यास अजुन काही काळ जावा लागेल. तोपर्यंत कोरोनाला रोखण्याचं आव्हान जगासमोर आहे. व्हॅक्सिन हा कोरोनावर कायमस्वरुपीचा उपचार नाही असंही याआधी जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं होतं. कोरोनाला रोखणं हे सध्या फक्त सोशल डिस्टन्सिंग आणि कोरोनाच्या प्रोटोकॉलचं पालन करणं या गोष्टीवरच आहे. लोकांनी काळजी घेतली तरच कोरोनाला रोखण्यात यश येऊ शकतं. जगातील काही देशांनी कोरोनाला रोखण्यात यशही मिळवलं आहे. त्यात न्यूझीलंडचा क्रमांक सर्वात वरती आहे. याशिवाय आणखी काही देशांनी वेळीच काळजी घेतल्यानं कोरोनापासून नागरिकांना वाचवता आलं.  

जगभरात जिवितहानी
कोरोनाचा सर्वाधिक दणका अमेरिकेला बसला. जगात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आणि मृत्यू अमेरिकेत झाले आहेत. आतापर्यंत 1 कोटी 15 लाख 33 हजार 569 जणांना कोरोनाची लागण झाली असून 2 लाख 52 हजार 631 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याखालोखाल भारताचा क्रमांक लागतो. भारतात 88 लाख 73 हजार 994 जणांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. तर 1 लाख 30 हजार 552 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अमेरिका आणि ब्राझीलच्या तुलनेत भारताचा मृत्यू दर हा दिलासादायक असा आहे. कोरोना रुग्णांची संख्या जास्त असली तरी भारतात रिकव्हरी रेटही चांगला आहे. ब्राझीलमध्ये 58 लाख 76 हजारांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आतापर्यंत 1 लाख 66 हजार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com