चिंताजनक : चीनच्या वुहानमधील कोरोना-एल विषाणू भारतात सापडला

चिंताजनक : चीनच्या वुहानमधील कोरोना-एल विषाणू भारतात सापडला

अहमदाबाद : चीनमधील वुहान शहरात कोरोनाच्या उद्रेकास कारणीभूत ठरलेल्या कोरोना विषाणूच्या 'एल' या प्रकारचा प्रभाव अधिक असल्याने गुजरातमध्ये कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याचा संशोधकांचा अंदाज आहे. संशोधकांच्या म्हणण्यानुसार, गुजरातमध्ये कोरोना विषाणूचे 'एल' आणि 'एस' असे दोन प्रकार संक्रमित झाले आहेत. त्यातील 'एल' हा प्रकार अधिक वेगाने पसरणारा आणि प्रभावशाली आहे. यामुळेच गुजरातमध्ये एकूण रुग्णांच्या तुलनेत मृतांचे प्रमाण अधिक आहे. अर्थात, हा अंदाज असून याबाबत सविस्तर अभ्यास सुरू आहे. गुजरातमध्ये आतापर्यंत १३३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

राज्य सरकारच्या गुजरात बायोटेक्नॉलॉजी रिसर्च सेंटरमधील (जीबीआरसी) शास्त्रज्ञ सी. बी. जोशी यांनी सांगितले की, कोरोना विषाणूवर अभ्यास करत असताना तो 'एल' प्रकारचा असल्याचे लक्षात आले. जगभरात जेथे कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे, तिथे कोरोना विषाणूचा हा प्रकार आढळल्याचे स्पष्ट झाले आहे. वुहानमध्येही हाच कोरोनाचा प्रकार प्रभावी ठरला होता. स्वतःची संख्या वाढविण्याच्या क्षमतेवरून त्याचा प्रकार ठरतो. 'जीबीआरसी'ला कोरोना विषाणूच्या गुणसूत्रांचा अभ्यास करून त्याचे तीन नवीन प्रकार शोधून काढले आहेत. ज्या कोरोनाबाधिताच्या शरीरातून या ठिकाणी चाचणीसाठी रक्त घेतले होते तो आता बरा झाला असल्याचेही जोशी यांनी सांगितले. 'एल' प्रकारचा कोरोना विषाणू आढळला असला तरी गुजरातमधील किती रुग्णांमध्ये या प्रकारचा विषाणू आहे, याचा अभ्यास झालेला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

एल प्रकारच्या कोरोना विषाणूचा प्रभाव अधिक असल्यामुळे गुजरातमध्ये मृत्यूचे प्रमाण अधिक असू शकते. 
- अतुल पटेल, साथरोग तज्ज्ञ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com